बिल गेट्स, स्टीव्ह जाॅब्स, बराक ओबामांसारख्या अनेक व्यक्ती जागतिक पातळीवरची मोठमोठी पदं भूषवताना येणारी मोठी आव्हानं सहज पेलताना दिसतात. आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींमुळे त्रासून जात हातावर हात ठेवून बसतो. पण ही मोठी माणसं त्यांच्यापुढे येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड देत असतील? या माणसांची यादी मोठी आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असला तरी या सगळ्यांच्या काही सवयींमध्ये कमालीचा एकसारखेपणा आहे. पाहुयात या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तींच्या काही सवयी.

१. दिवसाची सुरूवात लौकर करणे

आता ही गोष्ट आपल्या आईवडिलांपासून सगळ्यांनी कानीकपाळी ओरडून सांगितलेली असते पण आपल्याला हा सल्ला नेहमीच बोअरिंग वाटतो. पण अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओंनी आपण दिवसाची सुरूवात लौकर करतो असं सांगितलंय. रात्रभर शांत झोप झाल्यावर सकाळी उठल्यानंतरचे काही तास आपलं मन शांत असतं. यावेळी आपण अनेक गोष्टींचा शांतपणे विचार करू शकतो. पुढे सुरू होणाऱ्या दिवसाबाबत आपण यावेळी प्लॅन आखू शकतो. आणखी बरंच काही करू शकतो.

२. बॅलन्स्ड आयुष्य जगणे

आयुष्यात पुढे जायचं असेल तर घाम गाळावा लागतो हे खरं आहे. पण त्याचबरोबर समतोल आयुष्य जगावं लागतं. आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना वेळ देणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे व्हाईट हाऊसमध्ये असताना दर दिवशी सकाळी त्यांच्या मुलींच्या शाळेच्या तयारीसाठी वेळ द्यायचे आणि मगच त्यांच्या कामांकडे वळायचे. जर अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत हे करू शकतो तर आपण तर हे नक्कीच करू शकतो.

३. योग्य आहार आणि व्यायाम

बराक ओबामा रोज ९० मिनिटं व्यायाम करायचे. न चुकता. आता यापुढे तुमचं एक्सक्युज काय आहे? कोणी रोजच्या रोज डंबेल्स घेत घाम निघेपर्यंत व्यायाम करायला सांगत नाहीये तुम्हाला. चांगलं आरोग्य राखण्यासाठी नियमित केलेला हलका व्यायामही उपयुक्त ठरतो.

४. सोशल लाईफला फाटा न देणे

आता सोशल लाईफ म्हणजे सोशल मीडियावरचं लाईफ नाही. तर खरोखरचं सोशल लाईफ. आपल्या कामात व्यस्त असताना आपला मित्रपरिवार तसंच आपल्यासोबत काम करणार आपले सहकारी यांच्यासोबतचं आपलं नातंही आपला कामतला उत्साह दुणावायला मदत करतो.

वाचा- मानसिक ताणामुळे नकारात्मक विचारांचा त्रास

५. अपयशाचं योग्य मूल्यमापन करणं

या सगळ्या मोठ्या व्यक्ती कधी अपयशी झाल्याच नाहीत का? ‘अॅपल’ कंपनी स्थापन करणाऱ्या स्टीव्ह जाॅब्स यांना त्यांच्याच कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. ही कल्पना आपल्याला सहन तरी होईल का? जगप्रसिध्द कार्टूनिस्ट वाॅल्ट डिस्नी यांना ‘तुझ्याकडे कल्पनाशक्ती नाही’ असं सांगत पहिली नोकरी नाकारण्यात आली होती. आपल्या अॅक्टिंगसोबतच आपल्या धीरगंभीर आवाजासाठी प्रसिध्द असणारे अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना ‘तुमचा आवाज वाईट आहे’ असं सांगत आॅल इंडिया रेडियोमध्ये नोकरी नाकारण्यात आली होती. या अपयशाचं योग्य मूल्यमापन करत या सगळ्या लोकांनी पुढे इतिहास घडवला.

वाचा- हे करा आणि तुमच्या मुलांना चांगले मार्क मिळवून द्या

या सगळ्या खूप साध्यासोप्या गोष्टी आहेत. आपण आपल्या रोजच्या जीवनात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोठमोठ्या मॅनेजमेंटचे फंडे वाचत बसतो. तसं म्हटलं तर ‘लाईफ इझ सिंपल’. बेसिक गोष्टींची आपण काळजी घेतली तरी करिअरमध्ये आणि एकंदर जीवनात आपण मोठी प्रगती करू शकतो.