आज जागतिक एड्स दिन
‘त्या’ व्यक्तीला नोकरीतून काढून टाकल्यानंतर सहयोगी कर्मचाऱ्यांचेही राजीनामासत्र सुरू होते आणि कंपनीच्या प्रमुख जबाबदार व्यक्तीपुढे बाका प्रसंग उभा राहतो. आणि मग त्या अधिकाऱ्याचीही भावूक बाजू समोर येते, अशा आशयाच्या जाहिरातीने प्रेक्षकांनाही अस्वस्थ केले. प्रत्यक्षातही शिक्षण व कुशल कामाची पात्रता हेरून तरुण एचआयव्ही रुग्णांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून एचआयव्ही रुग्णांना समाजात आता ‘त्या’ नजरेने पाहणाऱ्या मानसिकतेचे प्रमाण तुलनेत कमी झाले असले तरी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा काहीसा प्रयत्न वाहन उत्पादन निर्मितीतील आघाडीच्या महिंद्र अॅन्ड महिंद्रच्या माध्यमातून सध्या नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या परिसरात होत आहे. यश फाऊंडेशनच्या सहकार्याने शिक्षण व प्रशिक्षणाच्या जोडीने कार्यशाळेच्या माध्यमातून रोजगार व नोकरीविषयक मार्गदर्शन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
एचआयव्ही रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना सामाजिक आधार देण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता चार महिने कालावधीचे प्रशिक्षण राबविले जाते. त्याचा लाभ घेणाऱ्या अनेकांना रोजगाराची संधी जवळच्या शहरातही उपलब्ध होत असल्याचे फाऊंडेशनचे रवींद्र पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. संस्थेच्या संपर्कात येणाऱ्यांपैकी ७० टक्के रुग्ण हे साक्षर असल्याचे नमूद करून पाटील यांनी त्यांच्यासारख्या वर्गाला नियमित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण कंपन्याही देत असल्याचे नमूद केले.
एचआयव्ही रुग्णांना रोजगाराची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबरोबर प्रवासातील सवलत-सुविधा, नोकरीकरिता विशिष्ट लाभ, उपचार तसेच औषधे आदींकरिता विशेष सहकार्य उपलब्ध होण्याची गरजही पाटील यांनी मांडली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या उत्कर्ष दाभाडे यांने सांगितले की, एचआयव्ही असूनही अनेक तरुणांमध्ये सामान्यांइतकीच शैक्षणिक व शारीरिक क्षमता असते; त्यांना कंपनी क्षेत्रातून संधी मिळणे गरजेचे आहे.
‘या आजारामुळे अनेकांना हातची नोकरी गमावण्याचीही वेळ येते; त्यामुळे कुटुंबावर अनेकदा सामाजिक तसेच आर्थिक संकटेही येतात व त्यातून सावरण्यासाठी रोजगार, उत्पादन निर्मिती देऊ शकणाऱ्या कंपन्या आदींनी या वर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे’, असे रेणुका भावसार यांनी सांगितले.