दिल्ली सरकारने शहरातील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ केले आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे प्रशासनात अनुभवी डॉक्टर्स दीर्घकाळ सेवेत राहतील असा विश्वास एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव नुकताच राज्यपालांकडे दिला होता. राजधानी दिल्लीत सरकारची ३६ रुग्णालये आहेत. गरिबांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ या निर्णयाने होईल अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची घोषणा केली होती.

‘वैद्यकीय’च्या जागा वाढवणार

जयपूर: २०१७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा दहा हजारने वाढवण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी येथे एका कार्यक्रमात केली. ‘नीट’ परीक्षेद्वारे त्या जागा भरल्या जाणार आहेत. देशभरातील ५८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील लवकर सुधारणा करण्याची घोषणा कुलस्ते यांनी केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सामान्य नागरिकांना अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी सरकार सर्व त्या उपाययोजना करत असल्याचे कुलस्ते यांनी स्पष्ट केले.