नैराश्य हा मानसिक आजार नसून सदोष प्रतिकारशक्ती प्रणालीशी त्याचा संबंध असतो, त्यामुळे वेदनाशामक औषधांनी त्यावर उपचार करता येतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. सध्या नैराश्यावर जे उपचार केले जातात त्यात सेरोटोनिन व मूड सुधारणारी रसायने दिली जातात जे न्यूरोट्रान्समीटर सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जेव्हा प्रतिकारशक्ती प्रणाली जास्त क्रियाशील असते तेव्हा सगळ्या शरीरात वेदना होतात, त्यामुळे आशाहीनता, दु:ख व ताण वाढतो. एखादा आजार किंवा वेदनादायी प्रसंगात प्रतिकारशक्ती प्रणाली कार्यान्वित होते, पण नंतर शरीर ती बंद करायला विसरते. विशेषकरून फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारात असे घडते. शरीराची प्रतिकारशक्ती प्रणाली काम सुरू करते, पण नंतर ते बंद होत नाही. त्यामुळे शरीरातील वेदना नाहीशी केली तर त्यामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होते, असे अभ्यासात दिसून आले आहे. शारीरिक वेदनांमुळे नैराश्य वाढीस लागते असे केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक एड बुलमोर यांनी म्हटले आहे. दी टेलिग्राफने म्हटले आहे की, वेदना व नैराश्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. केंब्रिज व वेलकम ट्रस्टच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, याबाबत नैराश्य दूर करण्यासाठी नवीन वेदनाशामक औषधांच्या चाचण्या पुढील वर्षी केल्या जाणार आहेत. प्रतिकारशक्ती प्रणाली विविध रोगांत  कार्यान्वित होते तेव्हा शरीरात काही बदल होतात. त्यात तांबडय़ा रक्तपेशी वाढतात त्यामुळे शारीरिक जखमा बऱ्या होतात. वेदना कमी होतात, पण नैराश्य वाढत जाते. अगदी प्राचीन काळी याच पद्धतीने विचार केला गेला होता.