चारचौघात उठून दिसण्यासाठी स्त्रियांना वेगवेगळ्या दागिन्यांचा पर्याय उपलब्ध असतो. पुरुषांसाठी तसे फारसे पर्याय नाहीत. मात्र हनुवटीखाली गाठ मारून छाती-पोटावर रुळलेल्या टायमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलते. इतकेच नव्हे तर टाय हे रुबाबदारपणा आणि सभ्यतेचा महत्त्वाचा संकेत मानला जातो.

इतर अनेक बाबतीत पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव असला, तरी अलंकारांबाबत मात्र महिला वर्गाचा वरचष्मा राहिला आहे. लग्न, सभा, संमेलने अथवा इतर विशेष प्रसंगी महिलांना नटण्या-मुरडण्याचे अनेक पर्याय असतात. पुरुषांना मात्र फारसे चॉईस नाहीत. त्यातल्या त्यात रुबाबदार अथवा चारचौघात उठून दिसण्यासाठी पुरुष मंडळींच्या मदतीला येणाऱ्यांमध्ये प्रमुख असते ती गळ्यातली टाय. काही शाळांच्या गणवेशामध्ये मुलांना टाय अनिर्वाय असते. शालेय आयुष्यानंतर मात्र रोजच्या जगण्यात बहुतेक जण टाय वापरत नाहीत. लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी खास शिवलेल्या कोटवर मात्र अगदी हटकून टाय बांधली जाते. नोकरीच्या इंटरव्ह्य़ूसाठी जाताना टाय घालून जाण्याचा रिवाज आहे. बाकी, विपणन अथवा विक्री क्षेत्रात काम करणाऱ्यांना ड्रेस कोड म्हणून रोज टाय बांधावा लागतो. उर्वरित समाजात टायबंधन हे फक्त पार्टी आणि विशेष समारंभांपुरते मर्यादित असते. टाय बांधल्याने व्यक्तिमत्त्व अधिक रुबाबदार दिसते. शिवाय टाय सभ्यतेचा संकेत आहे. त्यामुळे एरवी व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोणते काम करता, किती पैसे कमविता याला फारसे महत्त्व नसते. चारचौघात तुम्ही कसे दिसता त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. टायची गाठ चारचौघांमधील आपला प्रभाव वाढविते.

त्यामुळे विशेष प्रसंगी, नाईट आऊट किंवा पार्टीमध्ये एकदम रुबाबदार, क्लासी किंवा फंकी दिसण्यासाठी तुमच्या कपाटात काही चांगल्या टाय नक्कीच असायला पाहिजेत. शर्टवर कोणत्या प्रकारची टाय चांगली दिसेल हे आपण आपल्या शरीरयष्टीवरून ठरवू शकतो. जसे स्थूल शरीरयष्टी आणि जास्त वजन असणाऱ्या माणसांना ब्रॉड टाय आणि वजनाने कमी असलेल्या व्यक्तींना थीन टाय शोभून दिसते. प्रसंगानुरूप टायची लांबी बदलत राहते. कार्यालयात परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेल्टपर्यंत लांब असतात, तर पार्टीमध्ये परिधान केल्या जाणाऱ्या टाय या कॉलरपासून बेली बटन लांबीच्या असतात.

स्किनी

फोर इन हॅन्ड नेक टायमध्ये बदल करून तयार केलेली स्किनी टाय १९५०च्या दशकात बेटलिससारख्या पॉप आयकॉन्समुळे लोकप्रिय झाली. कॉटन, चामडे किंवा लोकरापासून बनविल्या जाणाऱ्या या नेकटाय परदेशात आताही प्रचलित आहेत. चेक्स, स्ट्रिप्स, प्लेन, लाइन्स अशा अनेक डिझाइन्समध्ये ही टाय उपलब्ध असते.  फॉर्मल पँट्सपेक्षा जिन्सवर स्किनी टाय फार उठून दिसतात.

‘फोन इन हॅन्ड नेक’

टायचे अनेक प्रकार असले तरी तरुणांपासून नोकरदार व्यक्तींमध्ये फोर इन हॅन्ड नेक टाय ही सर्वात लोकप्रिय आहे. विविध रंग, डिझाईन्स, रुंदी आणि कापडाच्या प्रकारात ही टाय उपलब्ध असते. या टायमध्ये विविध प्रकारच्या डिझाइन्स नसून संपूर्ण टाय ही प्लेन आणि एकरंगसंगतीमध्ये असते. कार्यालयात वावरताना आणि पारंपरिक प्रसंगांसाठी ही टाय आपणास एक चांगला लूक प्रदान करते.

‘सातकप्पी’

सेव्हन फोल्ड टाय (सातकप्पी) सिल्कच्या कापडापासून बनविली जाते. स्ट्रिप्स, डॉट्स, चेक्स अशा वैविध्यपूर्ण डिझाइन्समुळे या टाय दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. या टायचे कापड जाडसर असल्याने एक चांगली टाय नॉट बांधता येते. कार्यालयामध्ये किंवा काही पारंपरिक प्रसंगांसाठी सेव्हन फोल्ड टाय हा एक उत्तम पर्याय आहे. टायमध्ये वापरात येणाऱ्या मटेरियलमुळे या टायची किंमत जास्त असते.

‘अ‍ॅक्रॅलिक’

अँस्कॉर्ट टाय या नॉट बांधून सेट करण्याऐवजी त्या कॉलरमध्ये पिन करून अडकविल्या जातात. यास क्लिप ऑन टाय असेही म्हटले जाते. या टायमधील नावीन्यपूर्ण अशी अ‍ॅकॅ्रलिकटाय सध्या बॉलीवूड अभिनेत्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. या अ‍ॅक्रॅलिक टायमुळे काचेचा टाय लावल्यासारखेच आपल्याला वाटते. औपचारिक प्रसंगांमध्ये आणि पार्टीमध्ये हा टाय उठून दिसतो.

‘बोव्ह’

या विविध प्रकारच्या टायमध्ये ‘बो’ हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. विविध प्रकारच्या मोठय़ा पार्टी आणि सिनेतारकांच्या मेजवान्यांमुळे भारतात बोव्ह टाय प्रचलित झाली आहे. दक्षिणी देशात प्रचलित असणाऱ्या या टाय सूटवर अधिक शोभून दिसतात. प्लेन किंवा चेक्स डिझाइनमध्ये उपलब्ध असणाऱ्या या टाय औपचारिक किंवा विशेष प्रसंगांबरोबर नाईट किंवा कॉकटेल पार्टीमध्येही आपल्याला एक वेगळा लूक प्रदान करतात.

क्लासिक बोव्ह टायच्या बदलाचा एक प्रकार असलेल्या या वेस्टर्न बोव्ह टायला साऊथवेस्ट किंवा वेस्ट बोव्ह टाय असेही म्हणतात. सिल्क, पॉलिस्टर, कॉटन, लोकर अशा मटेरिअल्सपासून बनविल्या जाणाऱ्या या टायचा एक मजेशीर भाग म्हणजे या टायकडे बघून कर्नल सँडर्सची आठवण येते. साऊथवेस्ट बोव्ह टाय ही नैऋत्येकडील देशांमध्ये औपचारिक प्रसंगांसाठी अजूनही प्रचलित आहे.

‘नेकरचीफ’

किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला टायचा प्रकार म्हणजे नेकरचीफ. नेकरचीफ म्हणजेच फॉर्मल टाय. सर्वसाधारणपणे ही टाय गणवेशावर परिधान केली जात असल्याने कार्यालय अथवा औपचारिक प्रसंगांमध्ये उठून दिसत नाही. मात्र प्लेन, चेक्स किंवा डिजिटल प्रिंट अशा वैशिष्टय़पूर्ण डिझाइन्समध्ये उपलब्ध असणारी ही नेकरचीफ दररोजच्या जीवनात एक वेगळा लूक देते.

‘बोलो’

काळानुरूप टायचे अनेक प्रकार फॅशन जगतात प्रचलीत झाले. त्यातूनच सत्तरच्या दशकात बोलो टाय आली. बोलो टाय कॉईन्स, पिन्स आणि क्रिसमस ट्रीमधील अलंकार, चुंबक अशा निरनिराळ्या वस्तूंपासून बनविल्या जातात. पुरुषांच्या गळ्यातील दागिन्यांसारख्याच दिसणाऱ्या या टाय परदेशात अजूनही खूप लोकप्रिय आहेत.