आहारामध्ये कृत्रिमरीत्या गोडवा आणणाऱ्या पदार्थाचा समावेश केल्याने वजनामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. पदार्थाच्या गोड चवीमुळे आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रियेत मेंदूला दिलेल्या चुकीच्या संकेतांमुळे अधिक कॅलरी घेतल्या जातात, असे संशोधकांनी सांगितले.

गोडव्यामुळे ऊर्जा असल्याचे संकेत मिळतात. गोडव्यामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होण्यास मदत मिळते. शीतपेय एकतर अधिक प्रमाणात गोड असतात किंवा त्यामध्ये कॅलरीजची मात्र कमी असते तेव्हा चयापचय होण्याच्या प्रक्रियेत मेंदूला विस्कळीत संकेत पोहोचतो, असे येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

कृत्रिम गोडवा आणि कमी कॅलरी असलेली शीतपेये आणि खाद्यपदार्थामध्ये सामान्य साखरेऐवजी कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरले जातात. त्यामुळे चयापचयाची क्रिया अतिशय जलदपणे घडून येण्यास सुरुवात होते. कृत्रिम गोडवा असणारे पदार्थ खाणे आणि मधुमेह यांचा परस्परसंबंध असल्याचे, पूर्वीच्या अभ्यासात दिसून आले आहे.

करन्ट बायोलॉजी या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये गोड पदार्थामुळे कॅलरींचे अधिक प्रमाणात चयापचय कसे होते आणि त्यामुळे मेंदूला चुकीचा संकेत कसा दिला जातो हे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.