जे लोक नियमितपणे सोडा घेतात त्यांना इतरांच्या तुलनेत तीनपट अधिक स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असल्याचा इशारा नवीन अभ्यासात देण्यात आला आहे.

यासह जे लोक सोडा आणि फळांचा रस ही अधिक साखरेची पेये सातत्याने घेतात त्यांची स्मृती कमी होण्यासह एकूणच मेंदूचा आकार लहान होणे व हिप्पोकॅम्पलचा आकार लहान होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

उच्च प्रमाणात साखरेचे प्रमाण असलेले पेय घेणे आणि त्याचा स्मृती तसेच मेंदूचा आकार कमी होणे याचा परस्परसंबंध असल्याचे अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनच्या मॅथ्यू पेस यांनी म्हटले आहे.

जे लोक नियमितपणे सोडा घेतात त्यांना इतरांच्या तुलनेत तीनपट स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश येण्याचा धोका असतो. यासह मेंदूमध्ये रक्तपुरवठा पोहोचण्यास अडथळा निर्माण होण्यासह अल्झायमर आजार होतो, असे त्यांनी म्हटले.

अति प्रमाणात साखर शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेकदा शीतपेयाला अधिक आरोग्यदायी पर्याय म्हणून सोडा घेतात. मात्र ही दोन्ही उत्पादने कृत्रिमरीत्या गोड केली जातात. त्यामध्ये साखरेचे अधिक प्रमाण असते. ही दोन्ही उत्पादने घेतल्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होत असून, मेंदूच्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्यासह स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक आहे.

या अभ्यासासाठी ३० वर्षे वयाच्या जवळपास ४ हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये त्यांचे एमआरआय तसेच मेंदूशी संबंधित इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

हे संशोधन ‘अल्झायमर अ‍ॅण्ड डिम्नेशिया, अ‍ॅण्ड स्ट्रोक’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.