चहा-बिस्कीट असूदेत किंवा वडा आणि पाव असूदे एक पदार्थ असला की त्यासोबत दुसरा पदार्थ हवाच. अस्सल खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवायला या कॉम्बिनेशन्सशिवाय मजा नाही. मात्र तुम्ही कधी काही भन्नाट ट्राय करुन पाहिलंय? कधीतरी कॉलेजला असताना मित्राने चहा आणि कॉफी एकत्र करुन आपल्याला पाजलेले असते मात्र त्याच्या पलिकडे फारसे वेगळे काही आपण मुद्दाम ट्राय करत नाही. पण काही हटके कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय केलीत तर तुम्हालाही कळेल की थोडासा वेगळा विचार तुमच्या जिभेबरोबरच आयुष्यातही चव निर्माण करु शकतो.

मात्र अशाप्रकारे हटके गोष्टी एकत्रित ट्राय करायला तुम्हाला प्रयोग करण्याची आवड असायला हवी. सुरुवातीला ऐकून काहीसे विचित्र वाटेलही. हे दोन पदार्थ एकत्र कसे काय खाऊ शकता असा विचारही तुम्ही कराल. पण एकदाच ट्राय तर करुन पाहा.

१. एखादा चिझी पिझ्झा आणि लोणचं यांचं कॉम्बो तुम्ही कधी ट्राय केलंय? नाही ना मग नक्की खाऊन बघा. या नव्या पदार्थाला तुम्ही पिझ्झाचार (पिझ्झा + आचार) असंही म्हणू शकता.

२. मॅकडोनल्डमध्ये किंवा कोणत्याही फास्ट फूडच्या ठिकाणी गेलं की फ्राईजची ऑर्डर ठरलेलीच. मग हेच फ्राईज तुम्ही कधी आईस्क्रीमसोबत खाऊन पाहिलेत. बहुदा नाहीच. चला तर मग हे भन्नाट कॉम्बिनेशन चाखून पाहूया. पाहा तुम्हाला आवडतंय का?

३. स्ट्रॉबेरी आणि काळे मीठ हेही असेच एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. स्ट्रॉबेरी चवीला आंबटगोड आणि काळ्या मीठाचा खारटपणा नक्की चाखून बघा.

४. चॉकलेट आवडणाऱ्यांना कशासोबतही चॉकलेट चालते म्हणतात. हल्ली चॉकलेट पान, चॉकलेट सॅंडविच यांसारखे पदार्थ बाहेर सर्रास मिळतात. आता हे ठिक आहे पण चॉकलेट आणि दहीवडा हे म्हणजे जरा अतीच झाले. पण हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय तर करुन बघा.

५. चॉकलेट आईस्क्रीम आणि वेफर्स हे सहज उपलब्ध होणारे दोन पदार्थ. भर उन्हाळ्यात किंवा अगदी कोणत्याही सिझनमध्ये आईस्क्रीमचे नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. आणि यासोबत वेफर्स असतील तर विचारायलाच नको. हे यम्मी कॉम्बिनेशन किती मस्त लागेल पहायलाच नको.