उपवास करण्याला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. नुकताच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना झाला. या दरम्यान मुस्लिम बांधव रोजा धरतात. त्याचप्रमाणे काही दिवसांवर श्रावण महिना येत आहे. आजही आपल्याकडे श्रावणात उपवास करण्याची पद्धत आहेच. श्रावणी सोमवारचे किंवा श्रावणी शुक्रवार उपवास करण्याची पद्धत आहे. मात्र याशिवाय पूर्ण महिनाभर उपवास करणारेही अनेक जण आहेत. काही जण तर काहीच न खाता-पिता हे उपवास करतात. मात्र अशाप्रमाणे कडक उपवास आरोग्याला घातक ठरण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे ज्या लोकांना आधीपासूनच आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांच्यासाठी तर हे उपवास नक्कीच घातक ठरु शकतात. त्यामुळे कोणते आजार असल्यास उपवास करणे धोकादायक आहे समजून घेऊया…

अॅनिमिया

ज्या लोकांना अॅनिमिया आहे, त्यांनी उपवास करणे घातक आहे. या लोकांच्या शरीरात आधीच रक्ताची कमतरता असते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने अॅनिमिया होतो. अशातच योग्य पद्धतीने पोषण न झाल्यास जास्त त्रास होऊ शकतो. अॅनिमिक लोकांना लवकर थकवा येतो त्यामुळे त्यांनी उपवास करणे टाळलेलेच बरे. महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळत असल्याने त्यांनी उपवास न करणेच केव्हाही चांगले.

मधुमेह

मागील काही दिवसांपासून भारतातील मधुमेह असणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आहार, व्यायाम आणि औषधोपचार योग्य आणि वेळेवर घेणे आवश्यक असते. उपवासाचे पदार्थ मधुमेहासाठी घातक असल्याने या व्यक्तींनी उपवास करु नये.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी उपवास केल्यास तो त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी वेळच्यावेळी जेवण करणे आवश्यक असते. तसे न झाल्यास शारिरीक यंत्रणेवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

किडणी आणि यकृताचा त्रास असणारे रुग्ण

ज्यांना किडणीशी किंवा यकृताशी निगडीत काही समस्या असतात अशा लोकांनी उपवास करणे टाळावे. उपवास केल्याने किडणीवर तसेच यकृतावर ताण येऊन हे अवयव निकामी होण्याची शक्यता असते.

गर्भवती महिला

गर्भवतींच्या बाबतीत माता आणि बालक दोघांचेही चांगले पोषण होणे गरजेचे असते. त्यामुळे उपवास केल्यास योग्य पद्धतीने पोषण होत नाही आणि हे महिला आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे गर्भवतींनी उपवास करण्याचा विचारही करु नये.