अनेकांना स्मोकिंगची आणि काहींना तर चेम स्मोकिंगचे व्यसन असते. ही सवय वाईट आहे हे माहित असूनही त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे स्मोकिंग कऱणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याला तर धोका उद्भवतोच मात्र पॅसिव्ह स्मोकिंगमुळे या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यालाही धोका असतो. स्मोकिंग करणाऱ्या लोकांना श्वसनाचे त्रास होतात. तसेच हृदय आणि फुफ्फुसालाही त्याचा त्रास होतो. याशिवाय इतरही अनेक त्रास समस्या उद्भवू शकतात. या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तीही या व्यक्तीच्या व्यसनामुळे वैतागतात आणि त्यांच्यात वारंवार वाद होतात. त्यामुळे या लोकांनी व्यसन सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही खास घरगुती उपाय…

* ज्येष्ठमधाचे सेवन केल्याने स्मोकिंगची सवय कमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीने काही दिवस नियमित ज्येष्ठमध खावा. दिवसभरातील कोणत्याही वेळेस ज्येष्ठमधाची काडी तोंडात धरल्यास उत्तम. यासाठी वेगळे कष्ट कऱण्याची गरज नसते. काम करतानाही हा उपाय सहज करु शकतो. यामुळे स्मोकिंग कऱण्याची इच्छा कमी होण्याची शक्यता असते.

* ज्येष्ठमधासोबतच साधा मधही स्मोकिंग सोडण्यास उपयुक्त ठरु शकतो. मधामधे व्हिटॅमिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. धूम्रपानाची सवय सोडायची असल्यास दररोज मधाचे सेवन करावे.

* ओटस हे पोटभरीसाठी आणि आरोग्यासाठीही उत्तम पदार्थ आहे. ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे रोज सकाळी ओट्सचे सेवन करावे. ओटसचा शेक, धिरडे, खिर असे वेगवेगळे पदार्थ करता येतात.

* सर्व भाज्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. मात्र मुळा हा विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो असे म्हटले जाते. मुळ्याचे सेवन स्मोकिंग करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरते. मुळ्याचे पराठे, भाजी, कोशिंबिर, कटलेट करता येतात. याशिवाय मुळा मधासोबत खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

* स्मोकिंग करणाऱ्या लोकांचे व्यसन कमी व्हावे यासाठी होमिओपॅथीमध्येही उपचारपद्धती आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा जरुर वापर करा.