मूतखडय़ाचा (किडनी स्टोन) आणि हृदयविकाराचा संबंध आहे हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. विशेषत: बालकांना मूतखडय़ाचा त्रास होत असेल तर त्यांना हृदयविकारही होऊ शकतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे बालकांना जर मूतखडय़ाचा त्रास होत असेल तर त्यावर त्वरित उपचार करणे आणि मूतखडय़ाच्या विकाराचे निराकरण करणे आवश्यक आहे, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.
मूतखडा हा आता सर्वसामान्य विकार झालेला आहे. अनेकांना या विकाराचा त्रास होतो. या विकारासंदर्भातील योग्य पथ्ये पाळली जात नसल्याने त्याचे पूर्णपणे निराकरणही होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रौढांमध्ये अनेकदा मूतखडय़ामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. बालकांनाही याचा त्रास होतो, पण बालकांना त्यामुळे लवकर हृदयविकार बळावतो, असे अमेरिकेतील नेशनवाइन चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉक्टर कर्स्टन कुसुमी यांनी सांगितले.
हा अभ्यास करताना या डॉक्टरांच्या पथकाने ३० बालकांचा अभ्यास केला. त्यातील १५ जणांना मूतखडा झालेला होता. या सर्व बालकांच्या रक्तवाहिन्यांचा आणि त्यातील अडथळय़ांचा वेळोवेळी अभ्यास करण्यात आला. त्यातील मूतखडा झालेल्या बालकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येत असल्याचे आढळले. हे अडथळे वाढले तर या बालकांना निश्चित हृदयविकार होऊ शकतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. मूतखडा आणि हृदयविकार यांचा सबंध असल्याने मूतखडा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यायाम आणि आहार या संदर्भातील माहिती रुग्णालयांकडून देण्यात यावी, असे कर्स्टन म्हणाले.

ज्या बालकांना मूतखडय़ाचा त्रास होत आहे, अशा बालकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे आढळत आहे. रक्तवाहिन्यांच्या या अडथळय़ांमुळे हृदयाचे काम व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे बालकांना लवकरच हृदयरोग बळावत असल्याचे दिसून आले आहे.
– डॉ. कर्स्टन कुसुमी