‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’च्या अभ्यासातील निष्कर्ष
आशियाई इबोलाचे विषाणू म्हणून ओळखले जाणारे ‘क्रिमिएन काँगो हेमोरहॅजिक फिव्हर व्हायरस’ (सीसीएचएफ) हे विषाणू संपूर्ण देशभरात सक्रिय असल्याचे ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. देशात १७ वेळा या विषाणूंचा उद्रेक झाला. ५० जणांना या विषाणूंची बाधा झाली. त्यानंतर अनेकांचा या विषाणूंमुळे मृत्यू झाला. या विषाणूंचा मृत्युदर ८० टक्के इतका आहे.

अहमदाबादमध्ये २०११ मध्ये सर्वप्रथम हे विषाणू आढळले. प्राण्यांच्या शरीरामधून मानवामध्ये प्रवेश करणाऱ्या या विषाणूंचा फैलाव भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये झाला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात हिमाचल प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये हे विषाणू मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’चे संचालक डॉ. देवेंद्र मौर्या यांनी शास्त्रज्ञ प्रग्या यादव यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या साथीत या अभ्यासाचा अहवाल सादर केला. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यावरील परजीवी कीटक चावल्यावर हे विषाणू मानवामध्ये प्रवेश करतात. त्याचप्रमाणे, सीसीएचएफ विषाणूंचा प्रादुर्भाव असलेल्या रक्ताचा मानवी शरीराशी संपर्क झाल्यास हे विषाणू निरोगी शरीरात प्रवेश करतात. कत्तलखाना, रुग्णालयांमध्ये हे विषाणू मोठय़ा प्रमाणात आढळतात. भारतामध्ये या विषाणूंबाबत नागरिकांना जागरूक करण्यात येत असल्याची माहिती मौर्या यांनी दिली. या विषाणूंची माहिती करून घेतल्यास त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. डेंग्यू आणि सीसीएचएफ विषाणूंची लक्षणे मिळतीजुळती असल्यामुळे या दोन्ही आजारांमध्ये गल्लत झाल्यास मृत्यू ओढवू शकतो, असे प्रग्या यादव यांनी सांगितले. सीसीएचएफ विषाणूंची लागण झाल्यास जिवाला जास्त धोका असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, तसेच दुग्धव्यवसायही मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपयांच्या मांसाची निर्यात करण्यात येत असल्यामुळे भारतात सीसीएचएफ विषाणूंची लागण होण्याचा मोठा धोका आहे.
– डॉ. देवेंद्र मौर्या,
संचालक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी