आठ तास झोप घेणाऱ्या व्यक्ती पहिल्याच भेटीत भेटणाऱ्यांचे चेहरे व नावे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात, असे बोस्टनमधील ब्रिगॅम वुमेन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे.
चांगल्या स्मरणशक्तीसाठी आठ तास झोप आवश्यक असल्याचा निष्कर्ष या संशोधनात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी काढला आहे.
त्यांनी केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या वीस वर्षे वयोगटातील व्यक्तींना काही लोकांचे चेहरे व नावे दाखवून ती स्मरणात ठेवण्यास सांगितले गेले. बारा तासांनंतर त्यांना पुन्हा त्या लोकांचे चेहरे त्यांच्या योग्य अथवा चुकीच्या नावाने दाखविण्यात आले. ती नावे खरोखरच योग्य व्यक्तींची आहेत अथवा नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देण्यासोबत त्यांना आपल्या आत्मविश्वासाचेही एक ते नऊ या श्रेणीत मोजमाप करण्यास सांगितले गेले.
ही चाचणी दोनदा घेण्यात आली. त्यात त्यांना एकावेळी पूर्णपणे आठ तास झोपू देण्यात आले, तर दुसऱ्यांदा त्यांच्या झोपेत व्यत्यय आणला गेला. ज्यांना पूर्ण वेळ झोप मिळाली, त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे चेहऱ्यांसकट नावे लक्षात ठेवल्याचे व उत्तरे देतेवेळी त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात माहिती देताना रुग्णालयाच्या निद्राविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. जीन डफी म्हणाल्या की, नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी पूर्णवेळ झोप मिळणे आवश्यक असल्याचे या संशोधनातून निष्पन्न झाले. वाढत्या वयात निद्राविषयक समस्या उद्भवू शकतात. याचा स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
हे संशोधन ‘न्यूरोबायोलॉजी ऑफ लर्निग अँड मेमरी’ मासिकात प्रसिद्ध झाले आहे.