स्वभाव बदलणं शक्य नाही असंच सगळ्यांना वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. आपल्याला राग का येतो, त्याला आपला मेंदू तसाच प्रतिसाद का देतो, हे समजून घेतलं तर स्वभाव बदलता येतो.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘आरोग्य व्यवस्थेचं भविष्य’ या विषयावर जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या एका सत्रात जगभरातील हृदयरोगी बायपास शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यांचं पालन करतात का, या प्रश्नावर जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी चर्चा केली. सर्वसाधारणपणे हृदयरोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजाराचं निदान केल्यावर डॉक्टर रुग्णाला त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करून देतात, जेणेकरून तो रुग्ण त्याचं पुढील आयुष्य सुखरूप जगू शकतो. आणि या आखून दिलेल्या जीवनशैलीचं पालन न केल्यास होणाऱ्या अनिष्ट परिणामांची कल्पनाही या रुग्णांना दिली जाते. मात्र असं असतानाही तो रुग्ण नव्या जीवनशैलीप्रमाणे स्वत:मध्ये बदल करण्याचं नाकारतो व पूर्वीचंच जीवन जगतो. अशा अनेक व्यक्ती आपणांस दररोज भेटत असतील.

संभाव्य धोक्याची कल्पना असूनसुद्धा धूम्रपानाची वाईट सवय ते बदलू शकत नाहीत. ते असं का वागतात? अशी कल्पना करा की, एखादी कंपनी कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे डबघाईला येते. कंपनीचे उच्चपदस्थ आपल्या कर्मचाऱ्यांना परिस्थितीबद्दल पूर्ण माहिती देतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना सज्जड ताकीदही दिली जाते. कंपनी बंद पडल्यामुळे नोकरीवर गदा येण्याची धोक्याची सूचनाही दिली जाते. पण तरीही कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीमध्ये वर्षांनुवष्रे बदल दिसत नाहीत. आणि ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते. कुटुंबामध्येही मुलांच्या बाबतीत अशीच काही परिस्थिती दिसते. मुलं तासन्तास टीव्ही पाहतात, व्हिडीओ गेम्स् खेळतात. त्यांना धाक दाखवून किंवा त्यांच्यावर दबाव आणूनही त्यांच्या वर्तणुकीमध्ये, अभ्यास करण्याच्या शैलीमध्ये किंवा काही सवयींमध्ये बदल घडून येतच नाहीत. जीवनमरणाचा प्रश्न असूनसुद्धा किंवा भविष्यकाळातील समस्या किंवा अधोगती दिसून येऊनसुद्धा काही व्यक्तींमध्ये परिवर्तन घडून येत नाही.

गेलं दशकभर या विषयावर मानसशास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक, तत्त्वज्ञ व संशोधक संशोधन करीत आहेत. व्यक्तींमध्ये बदल कसा घडू शकतो? यामागची प्रक्रिया काय आहे? त्याचप्रमाणे परिवर्तन घडविण्यामागे कार्यालयातील वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी, घरामध्ये कुटुंबीयांनी व स्वत: त्या व्यक्तीनं नेमकं काय करावं, या प्रश्नाच्या मुळाशी खोलवर जाऊन संशोधन सुरू आहे. ‘स्वभावाला औषध नाही..’ किंवा ‘कुत्र्याचं शेपूट.. वाकडं ते वाकडंच..’ असं मनुष्यस्वभावाबद्दल बोललं जातं; परंतु आता ‘स्वभावाला औषध आहे!’ अशा निष्कर्षांपर्यंत संशोधक येऊन पोहोचले आहेत.

अ‍ॅलन डय़ुशमन नावाच्या संशोधकानं आपल्या ‘चेंज ऑर डाय’ या अद्भुत पुस्तकामध्ये म्हटलं आहे, की ‘जीवन-मरणाचा प्रसंग असो वा भवितव्याचा प्रश्न असो, अशा अटीतटीच्या वेळी व्यक्तीमध्ये बदल घडून येईल असं आपल्याला वाटतं. नाही का? पण तसं नेहमीच घडत नाही. पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक जीवनपद्धतींमुळे व्यक्तीमध्ये बदल घडविणं कठीण असतं. वास्तवाची माहिती देऊन, भय दाखवून किंवा दबाव आणून त्या व्यक्तींमध्ये बदल घडत नाही किंवा त्यातून त्यांना प्रेरणाही मिळत नाही.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या डॉक्टरांनी त्या आजाराची संपूर्ण माहिती देऊन, मरणाची भीती दाखवून किंवा आपल्या नपुण्याचा त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी उपयोग करूनदेखील त्या रुग्णांमध्ये विधायक बदल घडून येत नाही हे वास्तव पाहिलं तर मग बदल घडण्यामागचं नेमकं मानसशास्त्र आहे तरी काय? एखादी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे. एवढंच सांगून उपयोग होत नसेल तर त्याच्या पुढे जाऊन या व्यक्तीच्या ‘मनाशी’ संवाद साधणं गरजेचं असतं. त्यामधून त्या व्यक्तीच्या मनात भविष्याबद्दल नवीन आशा निर्माण करावी लागते.

या बदलांचं मानसशास्त्र जाणण्यासाठी केलेल्या सखोल संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे, की हे बदल घडविण्यासाठी त्या व्यक्तीशी एक सुदृढ, भावनाधिष्ठित, परिपूर्ण असं नातं प्रस्थापित करणं सर्वात महत्त्वाचं आहे. १९५० साली एका प्रख्यात विद्यापीठामध्ये एक परीक्षण घेण्यात आलं. त्यामध्ये मानसिक अस्वास्थ्य असलेल्या व्यक्तींमध्ये बदल घडविण्यासाठी कोणत्या प्रकारची उपचारपद्धती उपयोगी पडते यावर संशोधन करण्यात आलं. त्यानंतर जी निरीक्षणं करण्यात आली त्या सर्वामधून तो ‘रुग्ण’ आणि ‘उपचार’ करणारी व्यक्ती यांच्यातील ‘भावनिक संलग्नता’ किंवा त्यांच्या मनांचं जुळणं सर्वात महत्त्वाचं आहे, असं निष्पन्न झालं. अर्थात हे उपचाराच्या पद्धतीवर अवलंबून नसून त्या दोन व्यक्तींमधील नात्यातील विश्वासावर व दृढतेवर ते अवलंबून असतं, असं दिसून आलं.

कंपनीमधील कर्मचारी, गंभीर आजार जडलेले रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांच्या वर्तणुकीमध्ये परिवर्तन सहजासहजी का दिसून येत नाही? उदाहरणार्थ एका कुटुंबामध्ये मुलाची अभ्यासात अधोगती होत असते. चौथीपर्यंत चांगले गुण मिळवणारा तो मुलगा आठवी-नववीपर्यंत अभ्यासात हळूहळू मागे पडायला लागतो. चांगले गुण मिळविण्यासाठी केला जाणारा ‘अभ्यास’ मनापासून करण्याचा सल्ला त्याला पालक व शिक्षक सतत देत असतात. परंतु स्वत:हून मन लावून अभ्यास करण्याचा तो अजिबात प्रयत्न करीत नाही. अशा वेळी त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणणं हे पालकांसमोर एक आव्हान असतं. पालक त्याला वास्तवाची कल्पना व माहिती देतात, त्याला परिणामांची भीती दाखवतात व त्याच्यावर दबाव आणून, त्याच्या हात धुऊन मागे लागून, अभ्यास करण्यासाठी त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवस त्याच्यामध्ये थोडा बदल दिसतोही, पण नंतर परत ‘येरे माझ्या मागल्या.’ त्या मुलाच्या मनात डोकावून बघितलं तर ‘कळतंय पण वळत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आपण अधोगती थांबवली पाहिजे, आपल्याला चांगले गुण मिळाले पाहिजेत, असं खरं तर त्या मुलालाही मनोमन वाटत असतंच. परंतु अभ्यास करून, प्रयत्न करून, आपण परत प्रगतीकडे झेप घेऊ शकतो ही आशाच मुळी तो हरवून बसलेला असतो. अभ्यास करूनसुद्धा सद्य परिस्थिती बदलणार नाही, हे विचार सतत मनात येऊन तो वैफल्य आणि निराशेच्या गत्रेत जातो. हे तो स्वत: व्यक्त करत नसल्यामुळे बाकी सर्वजण त्याला ‘निगरगट्ट’, ‘सांगूनसुद्धा न ऐकणारा’ अशी लेबलं लावून मोकळे होतात. परंतु या वेळी त्याला खरी गरज असते ती ‘उज्ज्वल भवितव्याच्या खात्रीची.’ अशा वेळेस पालकांना एक नवीन क्लृप्ती सांगितली जाते. पालकांनी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. त्याच्या भावनांचा विचार करून, त्याच्या मनाशी जुळवून घेतलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कमी गुण मिळवणारा मुलगाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. ‘आपण स्वत:च्या विचारात व वर्तणुकीत परिवर्तन आणलं तर आपणही निश्चितच चांगले गुण मिळवू’ असा विश्वास या मुलाला वाटला पाहिजे. त्यासाठी त्याने तशीच प्रत्यक्षातील उदाहरणं पाहिल्यास त्यालाही नियमित अभ्यासाचे आशादायक परिणाम दिसून येतात. तो स्वयंप्रेरित होतो व नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात करतो आणि पुढचं चित्रच पालटतं. त्याचे गुण वाढतात, प्रगती होते, आत्मविश्वासही दुणावतो व हळूहळू तो उज्ज्वल यशाकडे झेप घेतो. पालकांनी केलेले प्रयत्न योग्य दिशेने व ‘बदल’ घडविण्याच्या प्रक्रियेस चालना देणारे असले पाहिजेत. त्यामुळेच असा बदल घडून येऊ शकतो.

या संबंधीच ‘जनरल मोटर्स’ या कंपनीमध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. १९९० साली या प्रख्यात कंपनीनं आपला एक विभाग बंद केला. कारण काय तर कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता व त्यांची निराशादायक मनोवृत्ती. त्यांची वर्तणूक हाताळण्याच्या पलीकडे गेली होती. कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वास्तवाची माहिती देण्यात आली. नोकरी जाण्याची भीतीही दाखविण्यात आली. सर्व प्रकारच्या ‘दबाव तंत्राचा’ वापर करूनही कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल दिसत नव्हता. कालांतराने ‘टोयोटा’ कंपनीनं हा विभाग आपल्याकडे घेतला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडविण्यासाठी एक वेगळंच तंत्र वापरलं. त्यांनी या अमेरिकन कर्मचाऱ्यांना जपानमध्ये नेलं. तिथली कार्यप्रणाली दाखविली व ही त्यांची कार्यपद्धती हमखास यशाकडे नेते याचं आशावादी चित्र त्या अमेरिकन कर्मचाऱ्यांना अनुभवण्यास दिलं. जपानमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांच्या सृजनशीलतेनं ते कसे यशाची पायरी गाठतात याचं वास्तव त्यांच्यापुढे उभं केलं. हेच ‘आशावादी’ चित्र त्यांना इथे उपयोगी पडलं. पुढे तो बंद पडलेला विभाग कार्यक्षम होऊन यशस्वी झाला, हे वेगळं सांगायला नको.

बदल घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीच्या मनाशी ‘कनेक्ट’ होणं व त्याच्यामध्ये ‘स्वयंस्फूर्ती’ व ‘आशा’ जागृत करणं अत्यावश्यक आहे हे आपण पाहिलं. बदल घडविण्याची ही प्रक्रिया व त्यातील सर्व तंत्र व मंत्राचा यशस्वी उपयोग जगातील विविध नेत्यांनी, उद्योगजगतातील यशस्वी लोकांनी, मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंनी केला आहे. परिवर्तन घडविण्यासाठी त्या सर्व व्यक्तींना त्यांचा ‘इमोशनल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘भावनिक बुद्धिमत्ता’ उपयोगी आली आहे. यातील ठळकपणे उल्लेख करण्यासारख्या व्यक्तींपकी एक म्हणजे अमेरिकेतील ‘डीन ऑíनश’. हृदयरोग झालेल्या पण तरीही आपली जीवनशैली बदलू न शकणाऱ्या रुग्णांना ‘डीन ऑíनश’ यांनी एक ‘मास्टर प्लॅन’ आखून दिला. जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी त्या रुग्णांना शाकाहारी जेवण, विविध प्रकारचे शारीरिक व्यायाम, मनोवृत्तीय बदल अशी एक जीवनशैली आखून दिली. एक महिन्यानंतर त्याच रुग्णांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात बहुतांशी रुग्णांमध्ये महिन्याच्या आत छातीत दुखण्याचं प्रमाण कमी झालं होतं. रक्तामधील कोलेस्टेरॉलचं प्रमाण तसंच वजन जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी कमी झालं होतं. स्वत:मध्ये बदल घडवून आणल्यानंतर दिसणारे हे तात्कालिक परिणाम त्यांना ती योजना पुढे चालू ठेवण्यास व स्वयंस्फूर्ती जागविण्यास उपयोगी पडले. आता लाखो रुग्ण या योजनेचा वापर करून स्वत:च्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहेत.

स्वत:मध्ये बदल घडविण्यात यशस्वी होण्यासाठी काही प्रक्रियांमधून जाणं आवश्यक आहे. प्रथम म्हणजे आपल्या वर्तणुकीबद्दल ‘आत्मभान’ असणं. आत्मपरीक्षणातून हे साध्य होतं. स्वत:च्या वर्तणुकीचे फायदे व तोटे कळल्यावर समोर असलेल्या पर्यायांवर विचार करणं व त्यातील योग्य पर्याय निवडणं ही योजनेतील दुसरी पायरी. आखणी करून, त्या पर्यायाची अंमलबजावणी करणं व पुन्हा पुढे ‘आत्मपरीक्षण’ करून नेमकं काय चाललंय याचं भान ठेवणं. असं हे चक्र सदैव चालू ठेवल्यास कार्यक्षम होतं. त्यातूनच पुढे वर्तणुकीमध्ये बदल घडून येतो. मात्र हा तात्काळ होणारा बदल नसून स्वत:बद्दल खऱ्या अर्थानं जाणून घेणं असतं. व ‘आयुष्यात’ फक्त वयानं नव्हे तर आत्मज्ञानानं वाढणं असतं.

मध्यंतरी एका मुलाचे पालक माझ्याकडे मुलाच्या ‘वर्तणुकी’च्या काही तक्रारी घेऊन आले होते. मी बालरोग-चिकित्सेबरोबर ‘समुपदेशन’ही करतो हे त्यांना माहीत होतं. त्या मुलाच्या आईला आपला मुलगा सुमित याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे होते. किशोरवयीन सुमित भावनांच्या भरात खूप आक्रस्ताळेपणा करतो हा चिंतेचा विषय त्यांच्या घरामध्ये निर्माण झाला होता. सुमितच्या आईशी संवाद साधल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की पालक म्हणून त्यांनाही स्वत:मध्ये काही बदल करणं आवश्यक होतं. त्याची आई स्वत:ही खूप रागीट होती. रागाच्या भरात तिच्याही हातून काही ‘विसंगती’ निर्माण करणाऱ्या गोष्टी घडत होत्या. मी तिच्याशी ‘संवाद’ साधला व त्यांना ही परिवर्तनाची प्रक्रिया समजावून सांगितली. गेल्या एक-दोन  आठवडय़ांत घडलेल्या विविध प्रसंगांचा शांतपणे विचार करण्यास सांगितले. जेव्हा ‘राग’ येतो तेव्हा नेमकी कृती काय केली जाते, याबद्दल तिने आत्मपरीक्षण केलं.

बऱ्याचदा आपली सर्वाचीच ‘कृती’ व ‘वर्तणूक’ ही एका ठरावीक पद्धतीत असते. या पद्धती म्हणजे खरं तर आपल्या मेंदूमध्ये जुळलेलं विशिष्ट मज्जारज्जूचं जाळं असतं. हे जाळं लहानपणापासून विशिष्ट प्रकारेच जोडलं गेल्यामुळे लवचीक व मजबूत होत जातं. त्या मुलाच्या आईला याबद्दल संपूर्ण कल्पना देण्यात आली. आत्मपरीक्षणातून तिने स्वतच्या वर्तणुकीच्या पद्धती लक्षात आल्या व त्यामध्ये आपण स्वत कसे अडकले आहोत याचं आत्मभान निर्माण झालं. या बदलाची पहिली पायरी तिने ओलांडली होती. तिला त्या पद्धतीचा कसा उपयोग होत आहे, फायदे काय झाले, तोटे काय झाले याबद्दल विचार करण्यास सांगण्यात आलं. राग आला की ओरडणं, मारणं वगरे व्यक्त करण्याच्या पद्धती किती उपयोगी आहेत, त्याचे फायदे, तोटे आदी सर्व गोष्टींचा तिने विचार केला. त्यानंतर राग व्यक्त करण्याचे आणखी काही पर्याय आहेत का याचा तिने शोध घेतला. आणि एक एक पर्यायाचा विचार करून त्यातून योग्य तो पर्याय निवडला. ही बदल प्रक्रियेची दुसरी पायरी होती. मग पुढच्या वेळेला राग आल्यावर त्या योग्य पर्यायाची निवड करण्याचं व त्याची अंमलबजावणी करण्याचं तिने ठरविलं. त्याप्रमाणे आखणी करून कृती करण्यात आली. काही दिवसांनी तिला आपल्या स्वभावात बदल जाणवायला लागला. या परिवर्तनाच्या चक्रामुळे त्या यशस्वीपणे आपल्या स्वभावात परिवर्तन आणू शकल्या. घडवून आणलेला बदल त्यांना त्यांच्या किशोरवयीन मुलामध्येही काही दिवसांत दिसू लागला. ‘स्वभावाला औषध असतंच..’ हे त्यांनी स्वत: अनुभवलं आहे. ‘बी दी चेंज’ हे ‘बदला’चं मूलतत्त्व त्या स्वत: जगल्या होत्या.

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा