मरगळलेल्या शरीराला व मनाला उत्तेजना देण्याचे काम उत्तेजक पेये करतात. त्यामुळे अनेक जण एनर्जी ड्रिंक म्हणजेच उत्तेजक पेयांचे नियमित सेवन करतात. परंतु उत्तेजक पेयांचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे अमेरिकेतील मायो क्लिनिकच्या डॉक्टरांनी सांगितले.
अनेक कंपन्यांच्या उत्तेजक पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. कॅफिन आणि अन्य उत्तेजकांमुळे रक्तदाबावर परिणाम होतो आणि हृदयविकारासंबंधी अनेक समस्यांना सामोर जावे लागते, असे डॉ. अ‍ॅना स्वातिकोवा यांनी सांगितले. उत्तेजक पेयांच्या अतिरिक्त सेवनाने हेमोडायनामिकमध्ये (हृदयाला रक्तपुरवठा अखंडित ठेवणारी यंत्रणा) बदल होतात. त्यामुळे रक्तदाब व हृदयाचे ठोके वाढतात, परिणामी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा दावाही डॉ. स्वातिकोवा यांनी केला.
या शास्त्रज्ञांनी त्यासाठी काही व्यक्तींवर प्रयोग केले. प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींचा रक्तदाब व हृदयाचे ठोके सर्वप्रथम मोजण्यात आले. त्यानंतर त्यांना उत्तेजक पेय देण्यात आले. उत्तेजक पेयांचे सेवन केल्यानंतर काही वेळाने पुन्हा त्यांचा रक्तदाब व हृदयाचे ठोके मोजण्यात आले. ते पूर्वीपेक्षा अधिक होते, असे डॉ. स्वातिकोवा यांनी सांगितले.
उत्तेजक पेयांच्या सेवनाने सास्टोलिक रक्तदाबामध्ये ६.२ टक्के आणि डायस्टोलिक रक्तदाबामध्ये ६.८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. म्हणजेच उत्तेजक पेयांच्या सेवनाने रक्बदाबामध्ये सरासरी ६.४ टक्क्यांनी वाढ होते. ‘जर्नल जामा’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.