ज्या व्यक्तींच्या पोटाची चरबी वाढून कंबरेला घेर येतो, त्यांना विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका आहे. पोटाची चरबी वाढल्यामुळे आतडी, स्तन आणि स्वादुपिंडासह इतर अनेक कर्करोग होण्याचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

कंबरेच्या वाढलेल्या घेऱ्यावरून कर्करोगाचा असणारा धोका समजण्यास मदत होते. यामुळे आवश्यक असणारे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर (बॉडी मास इंडेक्स) समजण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी केल्यामुळे कर्करोग दूर होण्यास मदत होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संस्थेने म्हटले आहे.

ज्यांची कंबर ११ सेंटीमीटरने वाढली असेल त्यांना लठ्ठपणाशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका हा १३ टक्क्यांनी वाढतो. जर कंबर ८ सेंटीमीटरने वाढली असेल तर आतडय़ाचा कर्करोग होण्याचा धोका हा १८ टक्क्यांनी वाढत असल्याचे, संशोधकांनी सांगितले.

वाढता लठ्ठपणा हा धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाइतकाचं दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे. आतडे, स्तन, स्वादुपिंड यासह इतर १३ प्रकारचे कर्करोग यामुळे होतात.

अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या संप्रेरकावर परिणाम होत असून, यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी अनियंत्रित होण्यास सुरुवात होते. या सर्व घटकांमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांनी सांगितले.

या अहवालासाठी १२ वर्षे जवळपास ४३ हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये चरबीशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण १६०० रग्णांमध्ये आढळून आले.

हे संशोधन ‘ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.