आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिला येणाऱ्या बाळाच्या आगमनाची काळजी करत बसतात. मात्र त्यामुळे लहान अथवा वैद्यकीयदृष्टय़ा असुरक्षित, कमकुवत मुले जन्माला येऊ शकतात, असे एका अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी आर्थिक स्थितीचा ताण घेऊ नये, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

अमेरिकेच्या ओहायो स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी जवळपास १३८ गर्भवती महिलांचा अभ्यास केला. या वेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत आर्थिक ताण, उदासीनतेची लक्षणे, गर्भधारणेतील विशिष्ट त्रास, समजून आलेला ताण आणि सामान्य चिंता याबाबतच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या गर्भवतींचे वय २९ वर्षांच्या दरम्यान होते. तसेच त्या पाच ते ३१ आठवडय़ांच्या गर्भवती होत्या.

सहभागी झालेल्या गर्भवती महिलांनी बाळांना जन्म दिल्यानंतर संशोधकांनी त्यांच्या वैद्यकीय नोंदी आणि प्रश्नावली यांचा अभ्यास केला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

ज्या महिला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत आहेत, त्यांच्यापासून जन्माला येणारे बाळ हे लहान अथवा कमकुवत असण्याची शक्यता संशोधकांनी मागील अभ्यासाच्या निष्कर्षांवरून व्यक्त केली होती. या वेळी संशोधकांनी नक्की काय परिणाम होतो, त्याचा अभ्यास केला.

आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिला जन्माला येणाऱ्या बाळाच्या आगमनाची तसेच त्याच्या भविष्याबाबत काळजी करत बसतात. त्यामुळे बाळ लहान आणि वैद्यकीयदृष्टय़ा असुरक्षित, कमकुवत जन्माला येण्याची शक्यता निर्माण होते, असे संशोधकांना अभ्यासात आढळून आले.

सामाजिक आर्थिक स्थिती खराब असण्याचा घटक गर्भवतींवर परिणाम करतो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये गुंतागुंत वाढून त्याचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे ओहायो स्टेट विद्यापीठातील संशोधक अमांडा मिशेल यांनी म्हटले आहे.

हे संशोधन ‘वुमन्स मेंटल हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.