अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे मत

कोरडे डोळे ही सध्या मोठी समस्या आहे. पूर्वी वयोमानामुळे दृष्टी कमकुवत होत गेल्याने वृद्धांमध्ये किंवा रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये हा विकार असायचा. मात्र सध्या संगणकावर अधिक वेळ काम केल्याने कोरडे डोळे या विकाराची समस्या वाढलेली आहे. अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांनी यावर एक उत्तम उपाय सांगितला आहे, माशांचे तेल.

कोरडे डोळे या आजारात अश्रूंची निर्मिती कमी होते. डोळ्यांखाली सतत खाज येते किंवा जळजळते, डोळ्यांत काहीतरी खुपल्यासारखे वाटते. ही समस्या सध्या वाढत चालली आहे. पण नियमित मत्स्यतेलाचे सेवन केल्यास ही समस्या कमी होऊ शकते, असे न्यूयॉर्कमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. पेनी अ‍ॅसबेल सांगतात. ‘ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड’ या स्निग्ध पदार्थाच्या अभावामुळे डोळे कोरडे होतात. मात्र मत्स्यतेलामध्ये ‘ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण अधिक असते. ‘ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड’ अश्रूंच्या निर्मितीसाठी उपयुक्त असतात, असे अ‍ॅसबेल यांनी सांगितले.

कोरडे डोळे या विकारात डोळ्यांच्या पृष्ठभागाला आणि पापण्यांना सूज येते. मात्र मत्स्यतेलाने ही सूज कमी होऊ शकते, असा दावा अ‍ॅसबेल करतात. कोरडे डोळे हा गुंतागुंतीचा विकार आहे आणि त्यावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. डोळ्यांची काळजी हाच त्यावरील उपचार आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अ‍ॅसबेल आणि त्यांचे वैद्यकीय पथक ‘कोरडे डोळे आणि त्यावरील उपचार’ यावर संशोधन करत आहेत. हा विकार झालेल्या ६०० जणांवर त्यांनी संशोधन करून मत्स्यतेल हाच त्यावरील उत्तम उपाय असल्याच्या निष्कर्षांपर्यंत हे पथक आले आहे.

एका संशोधनानुसार डोळे कोरडे होण्याचे मुख्य कारण आद्र्र, दमट वातावरणात दीर्घकाळ राहणे, अति वातानुकूलित कार्यालय आणि डोळ्याची पापणी लवू न देता सतत संगणक किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहणे, हे आहे.