जर वैवाहिक जीवनामध्ये काही संघर्ष निर्माण झाला असेल आणि त्यामुळे जर तणाव आला असेल तर तो दूर करण्यासाठी आपले अगदी जवळचे काही खास मित्र आणि कुटुंबातील सदस्यांची आपल्याला मोलाची मदत होऊ शकते, असे एका अभ्यासात म्हटले आहे.

सामाजिक क्षेत्रात ओळख असेल तर वैवाहिक संघर्षांमुळे शरीरावर होणारा हानीकारक प्रभाव दूर करण्यासाठी मदत होत असते असे आम्हाला संशोधनात आढळून आले असल्याचे, अमेरिकेच्या ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठाचे लिसा नेफ यांनी म्हटले आहे.

तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही वादळे निर्माण होतात त्यावेळी ती दूर करण्यासाठी काही खास मित्र निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

समाजामध्ये आपली काही प्रमाणात ओळख असल्यामुळे आरोग्याच्या काही समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच यामुळे जोडीदारामुळे होणारा ताणही कमी होण्यास मदत होते.

संशोधकांनी या अभ्यासासाठी १०५ नवविवाहित जोडप्यांचा अभ्यास केला. त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये वैवाहिक संघर्ष होता. या जोडप्यांना त्यांच्या घरातील वातावरण आणि तुमचे कुटुंब आणि मित्रांशी असलेले संबंध याबाबत एक प्रश्नावली देण्यात आली होती. सहभागी झालेल्या जोडप्यांची सलग सहा दिवस कोर्टीसॉल चाचणीसाठी लाळ घेण्यात आली.

यामध्ये ज्या जोडप्यांचे कौटुंबिक संबंध आणि मित्र परिवार चांगला होता, त्यांना वैवाहिक संघर्षांमध्ये कमी प्रमाणात ताण येत असल्याचे दिसून आले.

तर ज्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्र कमी होते, त्यांना वैवाहिक संघर्षांमध्ये अधिक ताणतणावाला समोरे जावे लागल्याचे दिसून आले.

यामुळे जर वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष असेल आणि ताणतणावापासून मुक्ती हवी असेल तर घरामध्ये कौटुंबिक सदस्य आणि काही अगदी जवळच्या मित्रांची सोबत आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले.