फळातील साखर आरोग्याला उत्तम असते, असा सर्वसाधारण समज असला तरी फळातील फ्रुक्टोज या साखरेने मेंदूसह अनेक अवयवांना धोका निर्माण होत असतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील वैज्ञानिकांनी यावर सखोल संशोधन केले आहे. फ्रुक्टोजमुळे मेंदूतील जनुकांची मोठी हानी होते, त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार व स्मृतिभ्रंशासारखे रोग जडतात, कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते तथापि वैज्ञानिकांच्या मते या हानिकारक बदलांचा उतारा निसर्गात उपलब्ध असतो, त्यात ओमेगा ३ मेदाम्लांतील डोकोसॅखेनोईक आम्ल किंवा डीएचएमुळे हे हानिकारक परिणाम रोखलेही जातात. शिया झांग यांनी म्हटले आहे की, डीएचएमुळे एक किंवा दोन नव्हे तर अनेक जनुकात बदल होतात. तो फार प्रभावी परिणाम असतो.
डीएचए हे मेंदूच्या पेशी भित्तिकात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते, पण ते रोगांशी लढण्याइतके पुरेसे नसते. मेंदू व शरीर यात डीएचएनिर्मितीची क्षमता कमी असते. ती आपल्या आहारातून निर्माण होत असते, असे संशोधनाचे सहलेखक फर्नाडो गोमेझ पिनिला यांनी सांगितले. डीएचएमुळे मेंदूतील जोडण्या अधिक चांगल्या होऊन आकलन व स्मृती यात वाढ होते. डीएचए हे सामन माशात भरपूर असते, पण ते सागरी सामन माशातच असते हे येथे लक्षात घ्यावे. कारण सध्या मत्स्यशेतीही केली जाते. इतर मासे किंवा त्यांच्या तेलात तसेच आक्रोड, जवस, फळे व भाजीपाला यात ते असते. बीजीएन व एफमोड हे दोन जनुक महत्त्वाचे असतात. एकूण ९०० जनुके यात असली तरी ही दोन महत्त्वाची आहेत. या दोन जनुकांवर फ्रुक्टोजने परिणाम होतो. ही जनुके मेंदूशी संबंधित आहेत. या दोन जनुकांत बदल झाल्याने इतर जनुकेही बिघडतात. बीजीएन व एफमोड ही जनुके नवीन औषधात लक्ष्य केली जातात व त्यामुळे मेंदूतील जनुकात बदल झाल्याने होणारे अनेक रोग बरे करता येतात, असा दावा केला आहे.
फ्रुक्टोजमुळे जनुकांना फटका बसतो. फ्रुक्टोज जनुकातील सायटोसिन हा जैवरासायनिक समूह काढून टाकला जातो, त्यामुळे वाईट परिणाम होतो, त्यामुळे जनुक चालू-बंद होण्याची प्रक्रिया बिघडते. सायटोसाइन डीएनएमधील चार न्युक्लिओटाईडपैकी एक आहे. इबायोमेडिसिन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)