कोकोनट रोल

साहित्य :

उकडीसाठी : बासमती किंवा आंबेमोहोर तांदळाचे पीठ – १ पेला, पाणी – १ पेला, तूप -१ चमचा, मीठ – चिमूटभर, हळदीची पाने – १-२, काजू-बदाम पावडर – २ चमचे, साजूक तूप – १ चमचा सर्व्हिंगसाठी

चवासाठी : खवलेले ओल्या नारळाचे खोबरे –  २ वाटय़ा, पिवळा गूळ – १ वाटी, वेलची पावडर – १ चमचा

कृती :

चव : कढईत गूळ आणि खोबरे एकत्र करून मंद गॅसवर चव करून घ्या व त्यात वेलची पावडर घाला.

उकड : पातेल्यात पाणी गरम करून मीठ व तूप घाला. उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगले घाटा. झाकण ठेवा आणि साधारण १०-१५ मिनिटे ठेवून द्या.

रोल : उकड ताटात काढून पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्या. त्याची गोल पोळी लाटून त्यावर सर्वत्र तयार चव पसरवा. त्यावर काजू-बदामाची पावडर भुरभुरा. त्याचा रोल करा. दोन्ही कडांनी रोल नीट बंद करा. स्टीमरमध्ये हळदीचे पान ठेवून त्याला तेलाचा हात लावून त्यावर तयार रोल ठेवा. १०-१५ मिनिटे मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडा. मोदकाला हा एक नावीन्यपूर्ण पर्याय आहे.

मक्याचा हलवा

साहित्य :

मक्याचे दाणे – १ वाटी, ओलं खोबरं – १/२ वाटी, साखर – १ वाटी, साजूक तूप – १/४ वाटी, वेलची – २, वेलची पावडर – १ चमचा, केशर – ७-८ काडय़ा दुधात भिजवलेले, बदाम – ७-८ तुकडे केलेले

कृती :

प्रथम मक्याचे दाणे क्रश करून घ्या. पातेल्यात तूप गरम करा त्यात वेलची फोडून घाला त्यावर मक्याचे क्रश केलेले दाणे घालून नीट परता. त्यावर खोबरं घालून परता आणि वाफ आणा. नंतर त्यात साखर, वेलची पावडर, बदामाचे तुकडे आणि केशर घालून नीट एकत्र करा व परत वाफ आणा वरून बदामाचे काप घाला.

कडबू

साहित्य :

शिजवलेली चणाडाळ -१ वाटी, ओलं खोबरं – १ वाटी, काजू-बदाम तुकडे आणि बेदाणे – अर्धी वाटी, गूळ – १ वाटी बारीक चिरलेला, भाजलेली खसखस – पाव वाटी, वेलची पावडर – २ चमचे

पारीसाठी : कणीक – २ वाटय़ा, मीठ – चवीप्रमाणे, तेल – मोहनासाठी, साजूक तूप – तळण्यासाठी, वेलची पावडर – अर्धा चमचा

कृती :

प्रथम कणकेत मीठ आणि तेलाचे मोहन घालून कणीक भिजवून ठेवा.
सारण : गॅसवर कढईत गूळ घाला. त्यावर चण्याची डाळ घाला व चांगले घाटा. लगेच त्यावर खोबरं, १ चमचा खसखस, काजू-बदाम-बेदाणे तुकडे घाला. नीट एकत्र करून शेवटी वेलची पावडर घालून गॅस बंद करा. सारण थंड करा.
भिजवलेल्या कणकेचे पुरीसाठी गोळे करा. कढईत तूप तापत ठेवा. कणकेच्या गोळ्याची खालील बाजूस खसखस लावून पुरी लाटा. त्यात सारण भरून करंजीचा आकार द्या. कातणीने काता आणि गरम तुपात तळून घ्या.

मूगडाळ हलवा

साहित्य :

मूगडाळ – १ पेला ४-५ तास भिजवलेली, साखर – १ वाटी, दूध – २ पेले + अर्धी वाटी पाणी, बदाम – ७-८ भिजवून पातळ काप कापलेले, साजूक तूप – अर्धी वाटी, वेलची पावडर – १ चमचा, केशर – ८-१० काडय़ा दुधात भिजवलेल्या, वेलची – २

कृती :

भिजवलेली मूगडाळ चाळणीत काढा. रुमालावर ठेवून कोरडी करा. डाळ रवाळ वाटून घ्या. पातेल्यात तूप तापत ठेवा त्यावर वेलची फोडून घाला, लगेच मुगाची डाळ घाला आणि चांगली गुलाबी रंग येऊन तूप सुटेपर्यंत परतून घ्या. दूध+पाणी गरम करून परतलेल्या डाळीत घाला व नीट एकत्र करा. झाकण ठेवून वाफ आणा. नंतर त्यात साखर, वेलची पावडर, केशर, बदामाचे काप घालून नीट एकत्र करा. परत चांगली वाफ आणा.

केळ्याचे अप्पे

साहित्य :

बारीक रवा – १ वाटी, केळं – १, दही – अर्धी वाटी, गूळ – १ वाटी पातळ कापलेला, खाण्याचा सोडा – पाव चमचा, खवणलेलं ओलं खोबरं – पाव वाटी, मीठ – चिमूटभर, साजूक तूप – पाव वाटी, वेलची पावडर – अर्धा चमचा

कृती :

एका पातेल्यात केळं कुस्करून घ्या. त्यात मीठ, रवा, खोबरं, दही, गूळ आणि वेलची पावडर एकत्र करा. गरज पडल्यास थोडं पाणी घालून १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा.
अप्पे पात्र गॅसवर गरम करत ठेवा. त्याला तूप लावा. त्यात प्रत्येक पात्रामध्ये एक काजू ठेवा. भिजवलेल्या रव्यात खाण्याचा सोडा मिसळा आणि अप्पे पात्रात चमच्याने घाला. वरून परत थोडं तूप घाला. वर झाकण ठेवून खालील बाजू ब्राउन झाल्यावर उलटून दुसरी बाजू ब्राउन झाली की गरम गरम अप्पे तयार.
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा