दरवर्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये गावोगावी साजरी केली जाणारी गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाच्या जन्मसोहळ्याचे कौतुकच. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. अतिशय उत्साह आणि आनंदात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून “काला” करतात. यालाच दहीकाला असे म्हणतात. हा श्रीकृष्णाचा आवडता खाद्यपदार्थ होता असे मानले जाते. त्यामुळे कृष्णाला काल्याचा नैवेद्य दाखवून तो खाल्ला जातो.

श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते. ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.

भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. यादिवशी दहीहंडी उभारली जाते आणि विशिष्ट भागातील लहान-थोर मुले मनोरा करत ही दहीहंडी फोडतात. घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. मुले शारीरिक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला. याशिवाय श्रीकृष्णाने आपल्याला गीतेव्दारे कर्माचे महत्व सांगितले आहे. आपल्या कर्तव्यात कसूर करु नका हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याचे गुण काही प्रमाणात तरी आपण अंगी बाणवू शकलो तरी आपले आयुष्य सुकर होईल अशी धारणा असल्याने त्याची मनोभावे पूजा केली जाते.