दूध पिणे आरोग्यासाठी अत्यावश्यक असते असे म्हणत असतानाच काही जणांना मात्र दूध पिणे शक्य होत नाही. काहींना दूधातील लॅक्टोजची अॅलर्जी असते तर काहींना गॅसेसचा त्रास असतो त्यामुळे दूध न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. पण जर तुम्हाला दूध पिणे शक्य नसेल तर त्याला काही पर्याय उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे हे पर्याय दूधाइतकेच आरोग्यदायीही आहेत. पाहूयात काय आहेत हे पर्याय

१. सोया मिल्क – सोया मिल्क हा सामान्य दूधासाठी उत्तम पर्याय आहे. हा सोयाबिनचा अर्क आहे. सोयाबिनमधील गोडवा कमीजास्त करता येतो. गोड, कमीगोड किंवा फ्लेवर्ड सोयामिल्क आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. हे दूध तुम्ही दिवसातील कोणत्याही वेळेस पिऊ शकता. हे दूध गाईच्या दूधासारखेच असते कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन ड असते. ज्यांना मधुमेह आणि अर्थ्रायटीसचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे दूध उपयुक्त असते.

२. बदामाचे दूध – बदामाच्या दूधात मोठ्या प्रमाणात ई जीवनसत्त्व असते. बदामामधून अतिशय घट्ट आणि मलाईदार दूध मिळते. या जीवनसत्त्व ईमुळे बदामाच्या दुधाच्या एका कपातून दिवसभराच्या आहारातील ५० टक्के मूल्य असतात. यातील सर्वात चांगला भाग म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे दूध अतिशय चांगले असते याचे कारण म्हणजे यामध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात.

३. राईस मिल्क – हे दूध म्हणजे ब्राऊन राईसचे सिरप किंवा तांदळाचा स्टार्च असतो. सामान्य दूधाला पर्याय म्हणून लोकांना हे आवडू शकते. याचे शरीराला असंख्य फायदे होतात. शरीरात कार्बोहायड्रेटस आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर डॉक्टर अशाप्रकारे तांदळाचे सिरप पिण्याचा सल्ला देतात. दूधाच्या इतर पर्यायांपेक्षा हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. आरोग्याच्या कोणत्याही अवस्थेत हे दूध पिणे चांगले असते.

४. नारळाचे दूध – गाईच्या दूधाला हा अतिशय उत्तम पर्याय आहे. अनेकांना नारळाचे दूध प्यायला आवडते. यामध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असला तरीही ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यामध्ये सामान्य दूधापेक्षा प्रोटीन जास्त प्रमाणात असतात.