वयानुसार शारीरिक उंची प्रमाणात असणे आवश्यक आहे. मात्र भारतामध्ये सर्वाधिक उंची खुंटलेली मुले आहेत, असा एक अहवाल सांगतो. या मुलांची संख्या तब्बल चार कोटी ८० लाख आहे. यामागचे कारण आहार नसून अस्वच्छता आणि अशुद्ध पाणी हे असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. शौचालयांमधील अस्वच्छता हेही यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

उंची खुंटणे म्हणजे ही मुले ठेंगू आहेत, असे नाही. वयाच्या प्रमाणात या मुलांची शारीरिक उंची खूपच कमी असते. ही कुपोषणाची पहिली पायरी असते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. या अहवालानुसार ० ते पाच वर्षे वयोगटातील दर पाच मुलांमागील प्रत्येकी दोन मुलांची उंची खुंटलेली असते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक विकासावर होतो.

या अहवालानुसार भारतानंतर नायजेरिया व पाकिस्तान या देशांमध्ये उंची खुंटलेली मुले आढळतात. नायजेरियात एक कोटी ३० लाख, तर पाकिस्तानमध्ये ९८ लाख मुले या अवस्थेतील आहेत.

भारतात अजूनही उघडय़ावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे दरुगधी व जंतूंचा प्रादुर्भाव होतो. याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होतो. जवळजवळ ५० टक्के बालकांचे कुपोषण हे जंतूंमुळे होणारे पोटाचे विकार, अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेमुळे होते. अहवालानुसार एक लाख चाळीस हजार बालकांचा मृत्यू अतिसारामुळे होतो.

जगभरातील ६५ कोटी लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. त्याशिवाय अनेक जण अस्वच्छतेमुळे होणाऱ्या विकारांना सामोरे जातात. लहान मुलांचे भवितव्य स्वच्छतेवर अवलंबून आहे. त्यामुळे स्वच्छता राखा आणि तुमच्या मुलांचा शारीरिक, मानसिक विकास साधा, असा संदेश या अहवालाद्वारे देण्यात आला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)