शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना १० सत्रांमध्ये त्यांच्यामधील तणाव, आजार, औषधे वेळेवर घेणे व त्याबाबतचे धोरण आणि औषधांच्या दुरुपयोगाबद्दल माहिती देण्यात येते. डॉक्टर या अ‍ॅपच्या वापराची माहिती ठेवू शकत असून काही अडचणी आढळल्यास रुग्णांना मदत करू शकतात, दूरवरच्या भागात असलेल्या रुग्णांना टेलेमिडिसिनच्या माध्यमातून मदत करू शकतात.

अमेरिकेतील डार्थमाऊथ महाविदय़ालयातील संशोधकांनी अ‍ॅपच्या वापराची चाचणी केली असून या चाचणीत सहभागी झालेल्या दहा जणांना गंभीर मानसिक आजारात हे अ‍ॅप अतिशय उपयोगी असून या स्मार्टफोन अ‍ॅपच्या वापरामुळे ते समाधानी असल्याचे आढळून आले. तंत्रज्ञानाबाबत कमी माहिती असणारे रुग्णदेखील हे अ‍ॅप सहज हाताळू शकतात, असे या अभ्यासात आढळून आले.

गंभीर मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांना अशा प्रकारच्या उपचाराचा फायदा होत असून ते याचा स्वीकार करीत असल्याचे डार्थमाऊथ महाविदय़ालयाचे करेन फोर्टुना यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामध्ये पारंपरिक मानसोपचार हस्तक्षेपाच्या तुलनेत जास्त फायदे आहेत. अ‍ॅपमधून रुग्णांची वैयक्तिक, प्रतिबंधात्मक काळजी घेण्यास मदत होत असल्याचे फोर्टुना यांनी सांगितले. हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ गेरियाट्रिक सायकियास्ट्री या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.