अधिक बॉडी-मास इंडेक्स, कमरेचा वाढलेला घेर आणि टाइप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींना कर्करोगाचा धोका अधिक असतो असे नव्या संशोधनातून दिसून आले आहे.

अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट आणि अमेरिकन कॅन्सर सोसायटी यांनी संयुक्तरीत्या हा अभ्यास केला. त्यात स्थूलपणा आणि टाइप-२ मधुमेहाचा कर्करोगाशी असलेला संबंध तपासून पाहण्यात आला. अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे संशोधक पीटर कँपबेल आणि सहकाऱ्यांनी त्यासाठी १.५७ अमेरिकी नागरिकांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले. तसेच १४ अभ्यासांचा आधार घेतला.‘कॅन्सर रिसर्च’ नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात त्याचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.

या अभ्यासात सहभागी ६.५ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास होता. त्यापैकी २१६२ जणांना यकृताचा कर्करोग झाला. तसेच बॉडी-मास इंडेक्समधील प्रत्येक ५ किलोग्रॅम प्रति वर्गमीटर फरकाने कर्करोगाची शक्यता महिलांमध्ये ३८ टक्के, तर पुरुषांमध्ये २५ टक्के वाढलेली दिसली. कमरेच्या घेरात पाच सेंटिमीटरचा फरक पडला तर कर्करोगाचा धोका आठ टक्क्य़ांनी वाढल्याचेही दिसून आले. याबरोबरच व्यक्ती धूम्रपान व मद्यपान करतात त्यांना २.६१ पटींनी अधिक कर्करोगाचा धोका होता.

या तिन्ही बाबतीत यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असल्याचे आढळले, कारण या तिन्हीमुळे शरीराच्या चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो.

केवळ धूम्रपान आणि मद्यपानच नव्हे, तर स्थूलपणा आणि मधुमेह हे कर्करोगकारक घटक असल्याचेही यातून निष्पन्न झाले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या निष्कर्षांचे विशेष महत्त्व असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हिपॅटायटिस बी आणि सी यामुळेही कर्करोगाचा धोका वाढत असला तरी ते घटक वरील घटकांपेक्षा कमी घातक असल्याचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या संशोधक कॅथरीन मॅकग्लिन यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)