जे लोक आपल्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहरी करून करतात त्यांच्या शरीराचे वजन नियंत्रित अर्थात निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी करण्यात येणारी न्याहरी ही ‘राजा’सारखा घ्यावी आणि रात्रीचे जेवण हे एखाद्या ‘गरिबा’सारखे करावे असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

या संशोधनासाठी जवळपास ५० हजार लोकांच्या आहार घेण्याची पद्धत तपासण्यात आली. जे लोक सकाळी इतरांच्या तुलनेत अधिक प्रमाणात भोजन घेतात त्यांच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी प्रमाणात आढळून आला.

अमेरिकेच्या लोमा लिंडा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. दिवसाचे सगळ्यात शेवटी घेतले जाणारे अन्न आणि न्याहरी यांच्या दरम्यान असणाऱ्या वेळेचा बीएमआय कमी असण्याशी संबंध असल्याचे संशोधकांना आढळले.

सकाळच्या प्रहरी भरपेट न्याहरी केल्यामुळे त्यानंतर अधिक प्रमाणात भूकेची तीव्रता जाणवत नाही. न्याहरी केल्यामुळे गोड आणि अधिक चरबीयुक्त पदार्थ (उच्च स्निग्धांश) घेण्याची इच्छा निर्माण होत नाही. त्यामुळे आपले वजण नियंत्रित राहण्यास मदत होते, असे ‘न्यूट्रीशन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनाच्या प्रमुख हाना काहलोवा यांनी म्हटले आहे.

नियमित भरपेट न्याहरी केल्यामुळे समाधान वाढीस लागते. एकूण ऊर्जेचा वापर कमी होतो, संपूर्ण आहारातील गुणवत्ता वाढीस लागते. रक्तातील मेदाचे प्रमाण कमी होते. तसेच यामुळे शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात राहते, असे त्यांनी म्हटले आहे.

जे लोक संध्याकाळी अधिक प्रमाणात आहार घेतात त्यांच्यामध्ये हे उलटे परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीराचे वजन अधिक वाढवण्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. वाढलेले वजन शरीरामध्ये व्याधी निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.

निरोगी वजन ठेवण्यासाठी सकाळी करण्यात येणारी न्याहरी अधिक प्रमाणात करा. रात्रीचे भोजन अतिशय कमी प्रमाणात करा. स्नॅक्स आणि शीतपेये घेणे टाळा. न्याहरी हे दिवसातले सर्वात मोठे भोजन करा असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.