हृदयतज्ज्ञांचा इशारा

बदलती जीवनशैली आणि निकृष्ट आहार यामुळे जगभरात हृदयविकार झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र भारतात हृदयरुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण जगभरातील इतर देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती हृदयतज्ज्ञांनी दिली. भारतातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोची येथे शुक्रवारी ‘भारतीय हृदयविकार संस्थे’ची ६८वी वार्षिक परिषद झाली. या परिषदेत जगातील पाच महत्त्वाच्या हृदयविकार संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. भारतात हृदयविकार झालेल्यांची संख्या वाढत असून हृदयविकारासंबंधीची अनेक आव्हाने भारतात पार करायची आहेत, असे या तज्ज्ञांनी सांगितले.

‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’चे अध्यक्ष प्रा. मार्क क्रेगर यांनी हृदयविकार वाढण्यास मधुमेह जबाबदार असल्याचे सांगितले. भारतात मधुमेही रुग्णांची संख्या अधिक आहे. मधुमेह रुग्णांना उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल असतो. त्यामुळे या रुग्णांना हृदयविकाराचा धोका संभावतो, असे क्रेगर म्हणाले. भारतातील मधुमेहाचे रुग्ण शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. त्यामुळे ते हृदयविकाराचे बळी ठरतात, असेही क्रेगर यांनी सांगितले. भारतामध्ये व्यक्ती मृत्यू होण्याच्या अनेक कारणांपैकी हृदयविकार हे एक महत्त्वाचे आणि मोठे कारण आहे, असे जागतिक हृदय संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. सलीम युसूफ यांनी नमूद केले. भारतातील हृदयरुग्णांच्या सरासरी संख्येपेक्षा केरळमधील हृदयरुग्णांची संख्या तिपटीने अधिक आहे. केरळमधील रहिवाशांची जीवनशैली त्याला कारणीभूत असल्याचे मत युसूफ यांनी व्यक्त केले. हृदयाच्या बळकटीसाठी कबरेदके असलेले पदार्थ टाळले पाहिजेत आणि अधिकाधिक फळांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)