वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही केवळ स्मार्ट फोनवर विसंबून राहाल तर फारसा परिणाम होणार नाही, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. अमेरिकेतील अभ्यासकांनी वजन कमी करण्याच्या पारंपरिक उपायांबरोबरच त्याला स्मार्ट फोनची मदत कशी घेता येईल याबाबत वर्तवणुकीचा अभ्यास केला. त्यात हे स्पष्ट झाले. त्यासाठी मनावर नियंत्रण व खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. याबाबत सलग दोनदा १२ आठवडय़ांसाठी अभ्यास करण्यात आला. पहिल्यामध्ये स्मार्ट फोनच्या आधारे, तर दुसऱ्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने विचार करण्यात आला. या कालावधीत सहभागी १६ व्यक्तींना त्यांचे अनुभव कथन करण्यास सांगण्यात आले. तसेच पोषक आहार, वाचन तसेच दिवसभरातील व्यायाम याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रोत्साहन देण्यासाठी संशोधकांकडून सहभागी व्यक्तींना दिवसभरात तीन संदेश पाठवण्यात आले. त्यात पारंपरिक पद्धतीने व्यायाम करणाऱ्यांचे वजन अधिक कमी झाल्याचे आढळले. स्मार्ट फोन वापरण्यास कितीही सुलभ असले तरी प्रत्यक्षात वजन कमी करण्यास त्याचा फारसा लाभ झालेला नाही. असे प्रमुख संशोधक चाड जेन्सन यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जे अ‍ॅप दिले आहे त्यामध्ये वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व गोष्टी आपण आणू शकत नाही. त्याला सामाजिक पाठबळ किंवा इच्छाशक्ती ही तुम्हालाच दाखवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र या संशोधनातील निष्कर्ष पाहता आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी समाजाचे पाठबळ गरजेचे आहे. व्यायामाच्या दृष्टीने स्मार्ट फोन या अगदीच निरुपयोगी नाहीत. व्यायामाची आवड निर्माण करणे तसेच यातील आपली प्रगती पाहण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)