दक्षिण आशियात ज्यांना हृदयविकाराचा कुटुंबात आनुवंशिक धोका आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम जास्त आहे, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. धमन्यांच्या आतून थर जमा झाल्यानंतर त्यात कॅल्शियम साठून ते कडक होतात त्यामुळे रक्तपुरवठा अवरुद्ध होऊन हृदयविकाराचा झटका येतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या वैद्यकीय केंद्रातील संशोधनात दिसून आले आहे. दक्षिण आशियात ज्या लोकांच्या घरात आनुवंशिकतेने हृदयविकार आले आहेत त्यांच्यात हा धोका तिप्पट असतो. त्यांच्या धमन्यांत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १० ते १५ टक्के जास्त असते. जयदीप पटेल यांच्यासह काही वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून दक्षिण आशियायी वांशिक गटात हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते. दक्षिण आशियायी आई-वडील व त्यांच्या मुलांचे सीटी स्कॅन करण्यात आले असता त्यांच्यात धमन्यांचा हृदयरोग दिसून आला, असे हृदयविकारतज्ज्ञ पराग जोशी यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियायी लोकांमध्ये हृदयविकाराचा विचार करताना कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. हे संशोधन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी- कार्डियोव्हॅस्क्युलर इमेजिंग या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.