कधीकधी झोपेतून उठल्यावर अचानक आपल्याला चक्कर आल्यासारखे वाटते. झोप कमी झाल्यामुळे किंवा अंथरुणातून एकदम उठल्यामुळे असे झाले असेल असे आपल्याला वाटते. मात्र हा त्रास कमी रक्तदाबामुळे झालेला असू शकतो. आपण याकडे दुर्लक्षही करतो मात्र अशाप्रकारे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. तेव्हा जर तुम्हाला चक्कर येण्याचा, एकदम दमल्यासारखे वाटण्याचा किंवा अन्य कोणताही त्रास होत असेल तर आधी रक्तदाब तपासून घ्या. आणि तो कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर वैद्यकीय उपचारांबरोबरच हे घरगुती उपायही करुन पाहा.

१. बीटाचा रस – बीट हे आरोग्यासाठी अतिशय चांगले कंदमूळ आहे. बीटामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने ज्यांना हिमोग्लोबिनचा त्रास आहे त्यांनाही डॉक्टर बीट खाण्याचा सल्ला देतात. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनीही बीटाचा रस प्यायल्यास त्याचा फायदा होतो. दिवसातून दोन ग्लास बीटाचा रस प्यायल्यास रक्तदाब स्थिर होण्यास मदत होते.

२. तुळशीची पाने – तुळीशीच्या पानांचे महत्त्व आयुर्वेदात सांगितले आहे. साधा सर्दी आणि कफ झाला तरी तुळस उपयुक्त असते. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त ठरु शकतात. तुळशीच्या पानांचा रस काढून हा रस एक चमचा मधासोबत घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. सकाळी अनुशापोटी हे मिश्रण घ्यावे.

३. ज्येष्ठमध – ज्येष्ठमध आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त असतो. खोकल्यावरील रामबाण उपाय म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठमध कमी रक्तदाबावरही उपयुक्त ठरतो. ज्येष्ठमधाची पावडर कमी रक्तदाब असणाऱ्यांसाठी उपयुक्त असते. ही पावडर चहामध्ये घालून घेतल्यास कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

४. कॉफी – दैनंदिन व्यवहारामध्ये अचानक थकल्यासारखे वाटले किंवा रक्तदाब कमी झाल्यासारखे वाटल्यास कॉफी घेणे फायद्याचे ठरते. अशावेळी अर्धा कप कॉफीनेही बराच दिलासा मिळतो. त्यामुळे कॉफी हा रक्तदाबावरील उत्तम उपाय ठरु शकतो.