उन्हामुळे चेहरा, हात आणि मानेवर टॅनिंग होते. त्वचा काळी पडायला लागली की काय करावे कळत नाही. अनेक मुली या त्रासामुळे अस्वस्थ होतात. टॅनिंग घालवण्यासाठी अनेक जणी तर पार्लरमध्ये जातात. त्यासाठी खूपच पैसे खर्च करतात. पण काही घरगुती उपाय करून या त्रासापासून सुटका होऊ शकते. संत्री हे फळ अतिशय गुणकारी असते. संत्र्याच्या वापराने टॅनिंग घालवता येते आणि त्वचेचा रंगही उजळतो.

काय कराल?

१. संत्र्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. हे नियमित केल्यास चेहराही उजळतो.

२. संत्र्याच्या रसात सायट्रीक अॅसिड असते. ते ब्लिचिंगचे काम करते. संत्र्याचा रस चेहऱ्यावर लावणे अवघड वाटत असेल तर ‘आईस ट्रे’मध्ये ठेवून त्याचे क्यूब्ज चेहऱ्यावरून फिरवावेत. यामुळे चेहरा नितळ दिसण्यास मदत होते.

३. टॅनिंगपासून आपल्या त्वचेचा बचाव करायचा असेल तर संत्र्याच्या सालीची पावडरही अतिशय उपयुक्त ठरते. पावडरचा एक मोठा चमचा, एक चिमूट हळद, कॅलामाईन पावडर किंवा चंदन पावडर यांचे मिश्रण करुन त्यात थोडा मध घालावा. हे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. साधारण पाच ते सात मिनिटे हा लेप चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याला चकाकी येईल.

४. संत्र्याच्या सालीमध्ये क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स असते. हे क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे उन्हाने काळी झालेली त्वचा उजळण्यास मदत होते. नियमितपणे संत्र्याच्या सालीची पावडर चेहऱ्याला लावल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.