मेकअपमधला आविभाज्य घटक म्हणजे लिपस्टिक. कोणती लिपस्टिक कधी लावायची, कोणती शेड कशावर खुलून दिसेल, याची नीट माहिती असेल तर लिपस्टिकचं मर्म तुम्हाला अवगत झालं असंच समजा.

लहानपणी आईच्या मेकअप बॉक्समध्ये डोकावून पहिली वस्तू हातात येते ती म्हणजे ‘लिपस्टिक’. मग एरवी इतर मेकअप प्रकारांना नाही म्हणणारी आई बॉक्समधून एखादी लालचुटुक किंवा गुलाबी लिपस्टिक काढून मुलीला लावते. मग पूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान आपला खास मेकअप मिरवायला स्वारी तयार होते. लहानपणी जुजबी ओळख झालेली ही लिपस्टिक कॉलेजच्या उंबरठय़ावर जिवलग मैत्रीण होते. आजच्या घडीला कोणत्याही मुलीच्या मेकअप बॉक्समध्ये डोकावल्यास शाळेतल्या क्रेयॉन रंगाच्या बॉक्सपेक्षा जास्त लिपस्टिक शेड्स सापडतील. तरीही त्यांची लिपस्टिकची हौस पूर्ण होत नाही. दर वर्षी लिपस्टिकचे किती तरी ट्रेण्ड्स येतात. मॅट, ग्लॉसी लिपस्टिकपासून ते असंख्य शेड्स, स्टाइल्सच्या लिपस्टिक्स बाजारात येत असतात. सध्या फक्त लिपस्टिकच्या लेटेस्ट शेड असून चालत नाही, ती लिपस्टिक कशी लावावी याचीही तंत्रं असतात. यंदाही बाजारात लिपस्टिकचे हटके ट्रेण्ड्स आले आहेत.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Watch this video before eating strawberries
स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही

क्रिमझन, नारंगी आणि मजेंडा शेड्स
लाल रंगाच्या लिपस्टिक कधीच ट्रेण्डमधून जात नाहीत, पण त्याची कोणती शेड निवडता आहात, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असतं. यंदा किंचित गडद पण फ्रेश लुक असणारी क्रिमझन शेड ट्रेण्डमध्ये आहे. ही शेड बहुतेक सगळ्या स्कीनटोन्सवर साजेशी दिसते. मुख्य म्हणजे तुमचा मूड कितीही पडलेला असू देत, क्रिमझन शेड चेहऱ्याला उठाव देते. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा चेहरा फ्रेश दिसतो. रात्री पार्टीसाठीही तुम्ही हा लीपकलर सहज वापरू शकता. गुलाबी रंगात किंचित जांभळ्या रंगाची छटा असलेला मजेंडा रंगसुद्धा लिपस्टिक शेडमध्ये पुढे आहे. नेहमीच्या गुलाबी लिपस्टिकला पर्याय शोधत असाल, तर ही शेड नक्की वापरून बघा. या वेळी चर्चेत असलेला लीपकलर नारंगी आहे. फ्रेश, कलरफुल समर लुकसाठी हा शेड उत्तम आहे. उजळ पण अतिब्राइट नसलेला हा शेड कॉलेज किंवा ऑफिस लुकवर छान दिसतो. याशिवाय राखाडी आणि काळा रंगही यंदा लीपकलरमध्ये पाहायला मिळतोय. न्यूड शेड्समध्ये लीपकलरपेक्षा फाऊंडेशन आणि लीपग्लॉसच्या मदतीने परिणाम मिळविण्याकडे या वेळी कल आहे.

ट्रेण्डी पेस्टल शेड्स
ऐश्वर्या राय-बच्चनच्या कान्स फेस्टिव्हलमधील पर्पल लिपस्टिकची कितीही टर उडवली असलीत, तरी पेस्टल शेड्सचं लीपकलर्समधील आगमन तुम्ही रोखू शकत नाहीत. यंदा लाइट ब्ल्यू, पर्पल, पोपटी, बेबी पिंक, लेमन यल्लो असे हटके लीपकलर्स बाजारात दाखल झाले आहेत. एखाद्या पार्टीसाठी थोडा वेगळा लुक ट्राय करायचा असेल, तर या शेड्स वापरता येऊ शकतात. फक्त अशा वेळी तुमचा लुक सिंपल असू द्यात. तुमचा लीपकलर तुमच्या मेकअपचा फोकस असू द्यात.

लीप मेकअप
तुम्हाला प्रियांका चोप्राचे मोठे ओठ बघायला आवडतात की आलिया भटचे नाजूक, छोटे ओठ? तुम्ही कपडे किंवा मेकअप एखाद्या सेलेब्रिटीसारखा करू शकता. पण विशिष्ट प्रकारचे ओठ हवे असतील, तर शस्त्रक्रियेला पर्याय नाही. या शस्त्रक्रियेच्या परिणामांची खात्रीही देता येत नाही. कधी तरी अपेक्षित परिणाम मिळतो, तर कधी हा प्रयोग फसतोही. या महागडय़ा, किचकट आणि आरोग्याला अपायकारक पद्धतीला फाटा देत तुम्हाला अपेक्षित ओठांचा प्रकार काही प्रमाणात मेकअपच्या साहाय्याने मिळविण्याचे प्रयत्न हल्ली केले जातात. याला ‘लीप कॉन्टूरिंग’ म्हणतात.
चेहऱ्याला विशिष्ट वळण देऊन उठाव देण्याचा प्रयत्न मेकअपच्या साहाय्याने केला जातो, त्याला ‘कॉन्टूरिंग’ म्हणतात. फाऊंडेशनच्या वेगवेगळ्या शेड्सच्या मदतीने कॉन्टूरिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती इंटरनेटवर पाहता येतात. याच पद्धतीचं पुढचं पाऊल म्हणजे लीप कॉन्टूरिंग. लीपकलर लावण्याआधी फाऊंडेशनच्या मदतीने ओठांना अपेक्षित आकार दिला जातो.
‘डेप्थ इफेक्ट’ हाही लीप मेकअपमध्ये सध्या ट्रेण्डमध्ये आहे. ओठांच्या आतल्या बाजूला गडद रंगाची शेड आणि बाहेरच्या बाजूला फिकट रंगाची शेड वापरून ओठ मोठे भासविण्याचा प्रयत्न यामध्ये करतात. तसेच वरच्या ओठाला एक आणि खालच्या ओठाला दुसरा रंग वापरून मिक्स मॅचचा प्रकारसुद्धा हल्ली केला जातो.

ग्लिटर इफेक्ट
ग्लॉसी आणि मॅट यापलीकडे जात सध्या लिपस्टिकचा नवा प्रकार चर्चेत आहे, तो म्हणजे ग्लिटर इफेक्ट. नेहमीच्या लीप कलरला उठाव देण्यासाठी वेगवेगळ्या ग्लिटरचा वापर यामध्ये केला जातो. कित्येक ब्रॅण्डनी खास ग्लिटर शेडच्या लिपस्टिक बाजारात आणल्या आहेत. पण नव्या शेडमध्ये खर्च करायचा नसल्यास ग्लिटर ग्लॉससुद्धा बाजारात मिळतात. नेहमीच्या लिपस्टिकवर हा ग्लॉस वापरू शकता. सोनेरी, चंदेरी आणि वेगवेगळ्या रंगांच्या ग्लिटरसोबतच मल्टीकलर ग्लिटरसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या आयश्ॉडोमध्ये ग्लॉस टाकूनसुद्धा ग्लिटर इफेक्ट मिळवता येतो.

लीप आर्ट
नेल आर्टचे असंख्य प्रकार आतापर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पण त्याही पलीकडे मेकअपतज्ज्ञ सध्या लीप आर्टचे भन्नाट प्रकार शोधत आहेत. वेगवेगळ्या लीप शेड्स, स्टड्स आणि चमकी यांचा वापर यात केला जातो. आतापर्यंत सिनेमा पोस्टर्स, जाहिराती यांमध्ये लीप आर्टचा वापर केला जायचा. पण मेकअप आर्टिस्ट, ब्लॉगर्स लीप आर्टचे वेगवेगळे प्रकार वापरू लागले आहेत. अर्थात, हा प्रकार खर्चीक आणि वेळखाऊ आहे. तसेच ओठांवरची कलाकुसर खराब होऊ नये म्हणून खाताना, बोलताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे खास कार्यक्रम, पार्टीसाठी हे प्रयोग केले जातात.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा