मेंदूच्या कार्यक्षमतेचा विकास करणाऱ्या प्रशिक्षण पद्धती संशोधकांनी ओळखल्या असून डय़ुअल एन बॅक आणि कॉम्पलेक्स स्पॅन या प्रकारच्या प्रशिक्षण पद्धतींमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. या व्यायामांमुळे कोणाच्याही बुद्धिमत्तेत वाढ होत नाही, तर रोजच्या कामात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सुधारणा होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. संज्ञानात्मक प्रशिक्षणामुळे फायदे होतात किंवा होतच नाही अशा प्रकारचे मत लोक व्यक्त करतात. पण तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेत आहात हेदेखील महत्त्वाचे असल्याचे आम्ही जगापुढे मांडले आहे, असे अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या कारा जे ब्लॅकर यांनी सांगितले. कॉगनेटिव्ह एनहान्समेन्ट या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधात शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूलादेखील लक्षित व्यायामांद्वारे प्रशिक्षित करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या अभ्यासात सहभाग घेणाऱ्यांचे तीन गट करण्यात आले होते.

या दरम्यान त्यांची मूलभूत स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बुद्धिमत्तेची चाचणी करण्यात आली. त्यांनतर या तीनही गटांना महिनाभरासाठी वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा सराव करण्यास सांगितले. संशोधकांना ज्या गटाने डय़ुअल एन बॅक प्रशिक्षणाचा सराव केला त्याच्या स्मरणशक्तीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले.

या प्रशिक्षणात सतत बदलणाऱ्या अक्षरांना लक्षात ठेवावे लागते. कॉम्पलेक्स स्पॅन हा दुसऱ्या प्रशिक्षणाचा प्रकार असून यात लोकांना एका ठरावीक क्रमांत वस्तू लक्षात ठेवाव्या लागतात. लोक त्यांच्या क्षेत्रात काम करताना किंवा विद्यार्थी शाळेत कशा प्रकारे अभ्यास करतात हे जाणून घेण्यासाठी ही कौशल्ये महत्त्वपूर्ण असून तुम्ही केवळ जुन्या सवयी आणि माहितीवर अवलंबून राहू शकत नाही, असे जॉन हापकिन्स विदय़ापीठाच्या मज्जाविकार शास्त्रज्ञ सूजन कोर्टनी यांनी सांगितले.