उन्हाळा सुरू झाला की बाजारात द्राक्ष, कलिंगड, टरबूज दिसायला लागतात, हे सर्व बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. जसे जसे ऊन वाढायला लागते तसे थंड सरबत, इतर पेयं प्यावीशी वाटतात. मग घरात विकतची सरबतं, क्रश आणून ठेवले जाते. उत्साही गृहिणी घरातच वेगवेगळी सरबतं करून बघतात. उन्हातून आल्यावर थंडगार सरबत किंवा इतर काही प्यायला मिळाले तर स्वर्गसुखच. घरच्या घरी बरेच प्रकार करता येतात, जे ऊर्जा देणारे उत्साह वाढवणारे असतात. अशीच काही पेयं आपण पाहू या.
मँगो क्रीमी कॉकटेल

साहित्य : हापूस आंब्याच्या फोडी – दोन वाटय़ा
प्लेन व्हॅनिला आइस्क्रीम – चार स्कूप
व्हीपिंग क्रीम – दोन वाटय़ा
काजू, काळ्या मनुका, बदाम, अंजिराचे तुकडे – एक वाटी
मँगो जेली – अर्धी वाटी
आंब्याचा रस – अर्धी वाटी
कृती : एका उंच ग्लासमध्ये पाव वाटी आंब्याचा रस घाला. त्यावर व्हीपिंग क्रीम व्हीप करून घाला. आंब्याच्या फोडी ड्रायफ्रुट्सचे तुकडे घाला, त्यावर आइस्क्रीमचा स्कूप घाला. त्यावर मँगो जेली घाला. व्हीपिंग क्रीम व आइस्क्रीम घाला, परत आंब्याच्या फोडी घाला. या पद्धतीने ग्लास भरून सजवून सव्‍‌र्ह करा.

ऑरेंज सरप्राइज मॉकटेल

साहित्य : ऑरेंज ज्यूस – चार टेबल स्पून
रोज सिरप – एक टेबल स्पून
लिंबाचा रस – एक टी. स्पून
बर्फाचे क्यूब – चार
मीठ – चवीनुसार
सोडावॉटर – गरजेनुसार
कृती : एका उंच ग्लासामध्ये बर्फाचे क्यूब घाला त्यावर ऑरेंज ज्यूस घाला, त्यावर रोज सिरप घाला, त्यावर लिंबाचा रस, मीठ घाला,. सोडावॉटर सावकाश घाला. स्ट्रॉने स्टर करा आणि सव्‍‌र्ह करा.
कच्च्या कैरीचे सरबत
साहित्य : कैरी – एक साखर – दीड वाटी
वेलदोडय़ाची पावडर – दोन टी. स्पून
सुंठ पावडर – एक टी. स्पून मीठ – चवीनुसार
बर्फ – आवडीनुसार
कृती : साल काढून कैरी किसून घ्या. मिक्सरच्या भांडय़ात घ्या, त्यात साखर, मीठ गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्या. हे मिश्रण एका भांडय़ात घ्या. त्यात गार पाणी, वेलदोडय़ाची पावडर, सुंठ पावडर, बर्फ घालून छान मिक्स करा. ग्लासमध्ये ओतून सव्‍‌र्ह करा.
तयार केलेलं सरबत गाळून घेतलं तरी चालेल.

ब्लू हेवन मॉकटेल
साहित्य : ब्लू करकोवा सिरप – चार टेबल स्पून
लिंबूरस – एक टी. स्पून
बर्फाचे क्यूब्ज झ्र् आठ
थंडगार पाणी – अर्धा ग्लास
बारीक किसलेला बर्फ – आवडीनुसार
मीठ – पाव टी. स्पून
सोडावॉटर – गरजेनुसार
दोन चेरी, लिंबाच्या स्लाइस – सजावटीसाठी
कृती : उंच मॉकटेलचा ग्लास घ्या, त्यात बर्फाचे क्यूब्ज घाला, त्यावर ब्लू करकोवा दोन टेबलस्पून घाला, त्यावर मीठ, लिंबाचा रस घाला, ग्लास तिरका करून त्यात पाणी घाला. सोडावॉटर घाला, वरून किसलेला बर्फ घाला.
ग्लासला चेरी आणि लिंबाची स्लाइस लावून सजवा. स्ट्रॉसोबत सव्‍‌र्ह करा.
* ब्लू कलरचे हे मॉकटेल खूप छान दिसते; डोळ्यांना थंडावा देते.

मोईतो मॉकटेल
साहित्य :  पुदिन्याची पानं – पाव वाटी
बर्फ – सात ते आठ क्यूब्ज
लिंबू रस – चार टी. स्पून
सोडावॉटर – गरजेनुसार
मीठ – चवीनुसार
पिठीसाखर – चवीनुसार
कृती : दोन मॉकटेलच्या ग्लासमध्ये पुदिना चिरून थोडा थोडा घाला, त्यावर बर्फाचे क्यूब्ज घाला, त्यावर लिंबूरस मीठ, साखर घालून ग्लास तिरका करून सोडावॉटर घाला, परत पुदिन्याची पानं घाला, स्ट्रॉ आणि स्टर्रने सजवून सव्‍‌र्ह करा.
* ग्लासच्या कडांना रंगीत साखरेने सजवल्यास खूप छान दिसते.
सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com