लहान मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश फायदेशीर ठरतो. त्यामुळेच आपल्याकडे अनेक पालक त्यांच्या मुलांना अंड्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ घालतात. मात्र, भारतात अंडी साठवण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानाची कमतरता असल्याचे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. अस्वच्छतेमुळे अंडी खराब होण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्येही केवळ पोल्ट्रीमध्येच नाही, तर घरातही अंडी साठवण्यात अनेकदा चुकीच्या पद्धती अवलंबल्या जात असल्याचे दिसते.

इतर पदार्थांच्या तुलनेत अंडी साठवण्याबाबत पुरेसे ज्ञान ग्राहकांमध्ये नसल्याचे म्हटले जाते. अनेक जण अंडे फोडल्यानंतर हात धुवत नाहीत. याचे कारण म्हणजे अंडी खाणे सुरक्षित असल्याचा आपला समज असतो. मात्र अंड्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते खाणे आरोग्यासाठी चांगले असू शकते. याशिवाय, अंडी हाताळण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत ज्या पाळल्यास अंडी खाणे जास्त आरोग्यदायी होऊ शकते. पाहूयात काय आहेत या पद्धती…

१. अंडी हाताळणाऱ्याने आपले हात स्वच्छ साबणाने धुतलेले असावेत. याशिवाय, अंडी ठेवण्याची जागा आणि त्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असायला हवीत.

२. सध्या बाजारात रेडी टू इट प्रकारचे अनेक अन्नपदार्थ मिळतात. मात्र अंड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी हे अन्नपदार्थ असलेल्या भांड्यात अंडे ठेवणे टाळावे.

३. अंडी बाजारातून आणण्यासाठी वेगळी पिशवी वापरावी. तसेच फ्रीजमध्येही अंडी त्याचा इतर पदार्थांशी संपर्क येणार नाहीत अशी ठेवावीत.

४. अंडी फ्रिजमध्ये ठेवण्याआधी ती स्वच्छ धुवून मगच ठेवावीत.

५. अंडी असलेल्या रेफ्रिजरेटरचे तापमान ३३ ते ४० फॅरनहाईट इतके असावे.

६. अंडी फ्रीजबाहेर काढल्यानंतर ती दोन तासांच्या आत वापरावीत.