साधारण दहा को़टी वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज आता अस्तित्वात नसलेल्या डायनासॉरशी घरोबा करून पृथ्वीवर राहात असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासातून सिध्द करण्यात आले आहे. मानव आणि डायनासॉरच्या संदर्भातील या आधीच्या सर्व दाव्यांना या संशोधनाने आवाहण दिले आहे. या आधीच्या डायनासॉरच्या अवशेषांवरून करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये डायनासॉरचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यानंतर पहिला सस्तन प्राणी निर्माण झाल्याचा दावा केला आहे.      
डायनासॉरचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यानंतर जैवविविधतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्याच दरम्यान सस्तन प्राण्यांनी डायनासॉरची जागा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक मारिओ रेइज यांनी डिस्कव्हरी वाहिणीला सांगितले.    
ते सस्तन प्राणी पुढे उत्क्रांत होवून मानवासह आजचे आधुनिक सस्तन प्राणी निर्माण झाले असल्याचे या अभ्यासामध्ये नोंदवण्यात आले आहे. डायनासॉर नामशेष झाले नसते तर सस्तन प्राण्यांमध्ये नंतर झालेले बदल झाले नसते. परिणामी मानव प्रजाती देखील उत्क्रांत झाली नसती असा दावा या अभ्यासकांनी केला आहे. डायनासॉर बरोबर त्यावेळच्या एकूण ७७ प्रजाती नष्ट झाल्या व ज्या शिल्लक राहिल्या त्या पुढे जावून उत्क्रांत झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. डायनासॉरच्या सांगाड्यांच्या डी.एन.ए. परिक्षणांच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे विश्लेषन केले आहे. जिवशास्त्र पत्रामधून हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला आहे.