मेंदूत विषारी प्रथिन रेणूंची साठवणूक करण्यास प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या घेतल्याने अल्झायमर व इतर मेंदूरोग टाळता येतात, असे नवीन अभ्यासात दिसून आले. टेक्सास येथील बेयलर कॉलेज ऑफ मेडिसीन व जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसीनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, अल्झायमरची लक्षणे दिसण्यापूर्वी त्याचा मुकाबला करता येतो व त्यात तीन पद्धतीच्या उपाययोजना करता येतात. प्राण्यांच्या मेंदूची वाढ प्रयोगशाळेत केल्यानंतर त्यावर काही प्रयोग करण्यात आले. पार्किन्सन, अल्झायमर या रोगात मेंदूत काही प्रथिनांची जास्त साठवणूक होते, असे हुबा झोगबी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ताऊ प्रथिनांची साठवणूक झाल्याने अल्झायमरची शक्यता वाढते. या आजारांमध्ये आधीच्या परिस्थितीत काय घडते याचा अभ्यास केल्याचे ख्रिस्तियन लासगना रीव्हज यांनी सांगितले. ताऊ प्रथिनांची साठवणूक कमी केली तर अनेक बाबी साध्य होतात. नुआक १ या एन्झाइमची क्रियाशीलता रोखल्यास ताऊ प्रथिन साठण्याचे प्रमाण कमी होते. फळमाशी, उंदीर यांच्यावरील प्रयोगात नुआक १ चे प्रमाण ५० टक्के क मी केले तर ताऊ प्रथिनाची साठवण कमी होते. उंदीर व इतर सस्तन प्राण्यांतील मेंदूची हानीही कमी होते. मानवी पेशींवरही हे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात नुआक १ रोखल्यास ताऊ प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. न्यूरॉन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)