आज मधुमेह हा सर्वव्यापी विकार बनला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत, गरीबांना-श्रीमंतांना, स्त्री-पुरुषांना कुणालाही तो होऊ शकतो. यात वाईट गोष्ट अशी असते, की तो आपल्याला ‘झाला आहे’ हे लगेच लक्षात येत नाही. कारण त्याची लक्षणे अगदी हळूहळू सुरू होतात आणि एखाद्या दिवशी अगदी साध्या आजाराची तपासणी करताना त्यांचे निदान होते. मग लक्षात येते की तो हाताबाहेर गेलाय. साहजिकच मधुमेह होतानाचे काही साधे ठोकताळे आपण लक्षात घेतले, तर चाचण्या करून तो वेळेत आटोक्यात आणता येतो किंवा टाळतासुध्दा येऊ शकतो.

⦁ सतत लघवी होणे आणि तहान लागणे- मधुमेहामध्ये रक्तातली वाढलेली साखर मूत्रावाटे बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडे जास्त लघवी तयार करतात. त्यामुळे लघवी होण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः रात्रीच्या वेळेस ३-४ किंवा जास्त वेळेस मूत्रविसर्जनासाठी उठावे लागते. त्यानंतर खूप तहान लागते. असे होत असल्यास सावध व्हावे.

अचानक वजन घटणे- मधुमेहात इन्शुलिनच्या उणीवेमुळे रक्तात खूप साखर असूनही शरीराला ती उर्जा म्हणून वापरता येत नाही. साहजिकच स्नायूंमधील प्रथिनांपासून उर्जा मिळवली जाते. त्यामुळे स्नायूंमधील ताकद कम होत जाते आणि अचानक वजन घटू लागते.

सतत भूक लागणे- मधुमेहात जेवण केल्यावरही त्यामधून शरीराला उर्जा मिळत नाही. साहजिकच शरीराला उर्जेची गरज भासते आणि सतत भुक लागल्यासारखे वाटत राहते.

त्वचेबाबत लक्षणे- मधुमेहात रक्तवाहिन्या त्वचेला रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात करतात. त्यामुळे सातत्याने शरीराला खाज सुटते. तरुण मुलींमध्ये मानेभोवती काळे डाग दिसतात. त्याला ‘अॅकॅन्थोसिस निग्रिकांस’ म्हणतात. मधुमेहाच्या शक्यतेचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

जखमा चिघळणे- मधुमेहात व्यक्तींना जखमा झाल्यास, रक्तात साखर जास्त असल्याने त्या लवकर भरून येत नाहीत. रक्तातल्या वाढलेल्या साखरेमुळे त्यात जंतुसंसर्ग लगेचच होऊ शकतो. त्यामुळे जखमा लगेच चिघळतात. अशा जखमा पायांना, पायाच्या बोटांना झाल्यास वेळप्रसंगी तिथे गँगरिन होऊन पाय धोक्यात येतो.

दमणे, चिडचिड वाढणे- रक्तातील साखर जरी जास्त असली तरी उर्जा कमी पडल्याने व्यक्तीला सतत दमल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे मेंदूला योग्य प्रमाणात उर्जा न मिळाल्याने सतत चिडचीड होते.

नजर अंधुक होणे- डोळ्याच्या आतील द्रव पदार्थातली साखर वाढून मधुमेही व्यक्तीची नजर अंधुक होते, मोतीबिंदू लवकर होऊन दिसणे कमी होते, डोळ्याचा आकार बदलतो, त्यामुळे आधी चष्मा असेल तर नंबर वेगाने वाढतो.

वरीलपैकी एखादे किंवा एकाहून जास्त लक्षणे असतील, तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही तपासण्या आणि उपचार करावेत. लक्षात ठेवा, अशावेळी परस्पर फक्त रक्तशर्करा तपासून स्वतःच काही ऐकीव उपचार करणे हा आपल्या स्वतःच्या जीवाशी केलेला खेळ ठरु शकतो.

-डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन