माणसाच्या शरीरात अनेक उपकरणे प्रत्यारोपित करण्यात येतात, पण ती बॅटरीवर चालणारी असतात. आता बॅटरीमुक्त व शरीरातील अर्धवाही द्रवांवर चालणारी उपकरणे विकसित होत आहेत. ही उपकरणे जैवस्नेही असून, त्यात जैविक महासंग्राहक म्हणजे सुपर कॅपॅसिटर प्रणाली वापरली जाईल. त्यात शरीरातील रक्तद्रव व लघवी यातून मिळणाऱ्या लोह व इतर खनिजांचा वापर विद्युतभारित करण्यासाठी केला जाणार आहे. पेसमेकरचा वापर हृदयाचे ठोके नियमित करण्यासाठी होत असतो. त्यात बॅटरीचा वापर होतो, त्यातील बॅटरीऐवजी आता जैविक पातळीवर ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. नेहमीच्या बॅटरीजमध्ये विषारी द्रव्ये असल्याने ही उपकरणे शरीरास घातक ठरू शकतात, त्यामुळे ती नैसर्गिक ऊर्जास्रोतावर चालवण्याची ही संकल्पना स्वागतार्ह मानली जात आहे. या बॅटरीत गळती झाल्यास शरीराची मोठी हानी होते. लॉस एंजल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ व कनेक्टिकट विद्यापीठाच्या संशोधकांनी बॅटरीशिवाय शरीरात वापरण्याची उपकरणे तयार केली आहेत. त्यांनी शोधून काढलेला सुपर कॅपॅसिटर हा रक्तद्रव व लघवीतील घटकांवर चालतो. त्यात एनर्जी हार्वेस्टर नावाचे आणखी एक उपकरण वापरले जाते. यात शरीरातील हालचालीतून निर्माण होणारी ऊर्जा विजेत रूपांतरित केली जाते. नंतर ही विद्युत ऊर्जा सुपर कॅपॅसिटर गोळा करीत असतो. सध्याचे पेसमेकर हे ६ ते ८ मिलिमीटर जाडीचे असतात व त्यांचा व्यास ५० सेंटच्या नाण्याएवढा असतो. त्यातील निम्मी जागा ही बॅटरीने व्यापलेली असते. सुपर कॅपॅसिटर मात्र १ मायक्रोमीटर जाडीचा आहे म्हणजे माणसाच्या केसाएवढा त्याचा आकार आहे. त्यामुळे आकारही कमी होणार आहे.