जिओचा फोन बाजारात काही दिवसात दाखल होणार असून ग्राहकांमध्ये मोफत मिळणाऱ्या या फोनची मोठी प्रतिक्षा आहे. या फोनविषयीच्या चर्चांना उधाण आले असले तरीही हा फोन खरेदी करताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊया…

१. जिओवर व्हॉटसअॅप चालणार नाही – सध्या व्हॉटसअॅप सर्व स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत झालेले आहे. अनेकांना तर व्हॉटसअॅपशिवाय जगणे ही एकप्रकारची शिक्षाच वाटू शकते. जिओच्या फोनवर ग्राहकांना व्हॉटसअॅप वापरता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील संपर्कावर गदा येणार असल्याने तुम्ही हा फोन घेण्याची विचार करत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मात्र जिओचा आपला असा जिओ प्लॅटफॉर्म असणार आहे. त्यामुळे कंपनी आपल्या अॅपला प्रमोट करण्यासाठी मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप वापरु देत नाहीये.

२. जिओचा फोन दोन प्रकारचा असणार – जिओचा नव्याने येणारा फोन हा दोन प्रकारचा असणार आहे. क्वालकॉम प्रोसेसर आणि स्प्रेडट्रम कम्युनिकेशनच्या प्रोसेसरवर आधारीत असे दोन प्रकार असणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी जिओ आपल्याशी जोडली गेली असल्याचे जाहीर केले आहे.

३. हॉटस्पॉट चालू शकणार नाही – जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिओचा फोन हॉटस्पॉट या सुविधेला सपोर्ट करणार नाही. आता हे अशाप्रकारे का करण्यात आले आहे याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मुकेश अंबानींच्या घोषणेनंतर आयडिया, एअरटेलचा बाजार उठला

४. जिओ केबल सुविधा मोफत नसेल – जिओचा फोन बाजारात येणार असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले. यावेळी फोनला जिओची केबल जोडता येणार असल्याचे सांगितले होते. आणि टीव्हीवर केबल उपलब्ध होणार आहे. मात्र ही केबल फ्री मिळणार की त्यासाठी पैसे भरावे लागणार याबाबत कंपनीकडून कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. काही अहवालांनुसार या केबलसाठी ग्राहकांना ५०० ते १५०० रुपये मोजावे लागू शकतात. याशिवाय ३०९ रुपयांचा डेटा प्लॅनही घ्यावा लागणार आहे.

५. माय जिओवर फोन बुक करता येणार – जिओच्या फोनमध्ये माय जिओ असे एक अॅप्लिकेशन असणार आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना जिओचा दुसरा फोन बुक करता येणार आहे. सध्या एमआय कंपनीतर्फे अशापद्धतीने फोन बुक करता येतो.

६. रिफंड हवा असेल तर करत राहावे लागणार रिचार्ज – फोनच्या बदल्यात ग्राहकाला दीड हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तीन वर्षानंतर ग्राहकाने त्याच्याकडे असणारा फोन रिलायन्स जिओला परत केल्यावर, कंपनी दीड हजार ग्राहकाला परत करणार आहे. ३ वर्षानंतर ही रक्कम फोन परत केल्यावर मिळू शकणार आहे. यामध्येही एक अट घालण्यात आली आहे. ती म्हणजे ९० दिवसात म्हणजे साधारण एक महिन्यात फोन एकदा तरी रिचार्ज करावा लागणार आहे.

१५ ऑगस्टपासून जिओ फोनची चाचणी सुरु होईल आणि २४ ऑगस्टपासून फोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात होईल. दर आठवड्याला ५० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. जिओच्या फोनवर ग्राहकांना अमर्यादित डेटा मिळेल, असे अंबानी यांनी सांगितले. जिओचा अनलिमिटेड डेटा प्लान ‘धन धना धन’ केवळ १५३ रुपयांमध्ये या फोनवर उपलब्ध असणार आहे. यासोबतच या फोनवर व्हॉईस कॉल कायमस्वरुपी मोफत असणार आहेत. ५० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे ध्येय आहे.