शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. कारण पुरेशा झोपेअभावी मधुमेह होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनाअंती दिसून आले आहे. कमी झोपेमुळे शरीराची इन्शुलिनबाबत संवेदनशीलता कमी होते आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होत नाही, असे अमेरिकेतील संशोधकांना दिसून आले आहे.
कमी झोपेमुळे लठ्ठपणा, चयापचयात बिघाड, भावनात्मक चढउतार, आकलनात दोष व अपघातही होऊ शकतात. अमेरिकेतील बोल्डर येथील कोलॅरॅडो विद्यापीठातील केनिथ राइट ज्युनियर यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यांच्या मते जेव्हा खूप अपुरी झोप असते तेव्हा शरीराचे घडय़ाळ जेव्हा आपल्याला आता झोपा असे सुचवीत असते तेव्हा आपल्याला झोप लागत नाही तिथेच सगळा गोंधळ होतो. झोप झालेली नसताना जेव्हा आपण सकाळी अन्न खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते. या संशोधनाचे सहलेखक रॉबर्ट एकेल यांनी सांगितले की, सोळा सुदृढ स्त्री-पुरुषांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. यातील निम्म्या लोकांना पाच तास झोपू देण्यात आले. नंतर पाच दिवस नऊ तास झोपण्याची मुभा दिली तेव्हा झोप कमी असताना त्यांच्या रक्ताची चाचणी केली असता त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले दिसले.
नऊ तास झोपेच्या काळात त्यांची इन्शुलिन संवेदनशीलता पूर्ववत झाली, पण तरीही ती पूर्ण सुरक्षित पातळीवर नव्हती. कमी झोपेमुळे वजनही वाढते. त्याचबरोबर मधुमेहाचा धोका असतो. चयापचयाच्या क्रियेवर परिणाम झाल्याने असे घडत असावे. आपल्या मेंदूत चोवीस तासांचे एक जैविक घडय़ाळ असते. तेच आपल्या वर्तनावर व शरीरावर परिणाम करीत असते. आपल्याला रात्रीची झोप मेलॅटोनिन या संप्रेरकाने दिलेल्या संदेशांमुळे येते. जास्त मेलॅटोनिन तयार झाले की, झोपण्याचा संदेश मिळतो पण जर झोपेच्या वेळी कुणी अन्न खाऊ लागले म्हणजे निशाचरपणा करून वाटेल तसे वागू लागले तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. शरीरातील साखर प्रमाणात ठेवण्यासाठी इन्शुलिनचा वापर होतो. सुरुवातीला कमी झोपेतही शरीरावर परिणाम होत नाही, पण नंतर तो होत जातो. करंट बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.