अमेरिकेतील नव्या संशोधनातील माहिती

धूम्रपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र त्याचा त्रास इतरांना अधिक होतो, हे धूम्रपान करणाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. घरात धूम्रपान करणाऱ्या पालकांमुळे मुलांच्या आजारपणाला हातभार लागत असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. म्हणजेच ज्या घरातील आई-वडील घरामध्ये सातत्याने धूम्रपान करत असतील, तर त्या घरातील लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. धूम्रपानाचा सामना करण्याची क्षमता मुलांमध्ये नसल्यामुळे ती आजारी पडतात, असे या शास्त्राज्ञांनी सांगितले.

अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठातील संशोधकांनी लहान मुलांच्या २०११-१२मधील आरोग्यविषयक सव्‍‌र्हेक्षणातून हा अभ्यास मांडला आहे. यासाठी नवजात बालकापासून ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील १७.६ दशलक्ष मुले धूम्रपान करणाऱ्या पालकांसोबत राहतात. ९५,६७७ मुलांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. यातील ५ टक्के मुले घरात धूम्रपान करणाऱ्या पालकांबरोबर राहतात, असे संशोधकांनी सांगितले. धूम्रपान करणाऱ्या पालकांसोबत राहणाऱ्या मुलांना इतर मुलांच्या तुलनेत वैद्यकीय उपचारांची अधिक गरज असते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

याआधी करण्यात आलेल्या संशोधनांनुसार धूम्रपान हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वसनासंबंधीचे विकार आणि अस्थमा यांसारखे विकार लहान मुलांना होण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या घरातील मुलांना सातत्याने प्राथमिक उपचारांची गरज भासते. हा धोका लक्षात घेऊन पालकांनी घरात धूम्रपान करणे टाळावे. अन्यथा मुलांना लहान वयात गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.