जिओच्या मोबाईल फोनची बाजारात मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. ग्राहकांनी पहिल्या टप्प्यात या फोनला जोरदार प्रतिसाद दिल्याने कंपनीला आपल्या फोनचे बुकिंग काही काळासाठी थांबवावे लागले होते. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील बुकींग लवकरच सुरु होणार असल्याचेही कंपनीने नुकतेच जाहीर केले होते. हा फोन जवळपास मोफत मिळत असल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. या फोनची फिचरही अतिशय आकर्षक असून ग्राहकांकडून त्याला चांगली पसंती मिळाली होती. मात्र, हा फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्याची घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर जळालेल्या जीओ फोनचे फोटो व्हायरल झाले होते. परंतु, ते ट्विट काही वेळातच डिलीट कऱण्यात आले आहे.

कुणीतरी मुद्दामहून कंपनीची बदनामी करण्यासाठी हा कट रचल्याचे रिलायन्स जिओकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये फोनचा मागचा भाग जळाल्याचे म्हणण्यात आले असून फोन चार्जिंगला लावलेला असताना तो भाग पूर्णपणे उष्णतेने वितळल्याचे दिसत आहे. यामध्ये फोनच्या पुढच्या भागाला विशेष नुकसान झालेले नाही. या ट्विटमध्ये जळालेल्या फोनचे फोटोही देण्यात आले आहेत. या फोनबद्दल ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता असताना स्पर्धक कंपन्या अशापद्धतीने कट रचत असल्याचा आरोपही कंपनीने केला आहे.