येत्या दोन-तीन वर्षांत वार्धक्याला दूर ठेवणारे औषध तयार करणे शक्य होणार आहे. त्यात वैज्ञानिकांनी उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लांबवणारे कृत्रिम संयुग तयार केले आहे. लोमोस्कोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी व स्वीडनची स्टॉकहोम युनिव्हर्सिटी यांनी मायटोकाँड्रियाची वार्धक्याच्या प्रक्रियेतील नेमकी भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कृत्रिम अँटिऑक्सिडंट असलेल्या एसकेक्यू १ या संयुगाच्या मदतीने मायटोकाँड्रियावर प्रयोग करण्यात आले. जनुक संस्कारित उंदरावर त्याचे प्रयोग करण्यात आले असून त्याच्या जिनोममध्ये उत्परिवर्तन घडवून म्युटाजेनेसिसला उत्तेजन देण्यात आले होते. त्यामुळे या उंदरांमध्ये वार्धक्याची प्रक्रिया लवकर होऊन तो उंदीर नेहमीच्या जीवनकालाऐवजी दोन वर्षांत मरत असे. त्यामुळे वयामुळे होणारे विकार उंदरांना होत असत. १०० दिवस वयाच्या जनुकीय उंदरापासून एसकेक्यू १ या संयुगाचे प्रयोग करण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते त्यात मायटोकाँड्रियातून निघणाऱ्या मुक्तकणांपासून पेशींचे रक्षण होते. उंदरांच्या दोन गटांवर २०० ते २५० दिवस प्रयोग करण्यात आले. ज्या उंदरांमध्ये हे संयुग वापरले नव्हते ते लवकर वृद्ध झाले. काही उंदरांमध्ये वार्धक्याने शरीराचे तापमान कमी होणे, मणक्याला बाक येणे, त्वचा खराब होणे असे परिणाम वयानुसार दिसून येतात. शिवाय ऑक्सिजनचे वहन बरोबर होत नाही. हे संशोधन महत्त्वाचे असून त्यामुळे मायटोकाँड्रियाची वार्धक्यातील भूमिका समजली आहे, असे लोमोनोसोव मॉस्को स्टेट विद्यापीठाचे व्लादिमीर स्कुलाचेव यांनी सांगितले. यातून वृद्धत्वाची प्रक्रिया रोखणारे औषध दोन-तीन वर्षांत तयार करता येऊ शकेल.