दिवाळीची खरेदी एव्हाना झाली असेलच. पण सणांच्या दिवसात एकच ड्रेस पुन्हा वापरताना त्याला थोडासा ट्विस्ट देता आला तर? क्रिकेटच्या संघाप्रमाणे कपडय़ांमध्येही एक्स्ट्रा प्लेअर्स असतात, ते अशा वेळी मदतीला धावून येतात.

दिवाळी चार किंवा पाच दिवसांची. प्रत्येक दिवशी वेगवेगळा पेहराव करणे शक्य नसते. अशा वेळी जुनाच ड्रेस पुन्हा वापरण्याऐवजी त्यात थोडासा बदल केला तर? त्याने तुमचा लुकही वेगळा होतो आणि नवीन ड्रेस घातल्याचं समाधानही मिळते. हा प्रयोग हिट झाला तर त्या सणांचे तुम्ही ‘ट्रेंड सेटर’ ठरता ते वेगळं.

बाजारातील ट्रेंड रोज बदलत असले, तरी काही गोष्टी कायम असतात. बांधणीच्या ओढण्या आणि लेिगगचे दुकान, पारंपरिक साडय़ांचं दुकान, कोल्हापुरी चपला विकणारा चांभार अशा दुकानांना लेटेस्ट कलेक्शनचा तसा फरक पडत नाही. पण याच दुकानांमध्ये एखादा फेरफटका मारला की, गरजेच्या वेळी सहज वापरता येणारा, लुकला ट्विस्ट देता येणारा एखादा प्रकार सहज सापडतो. उदाहरणच द्यायचं झालं तर नेहमीच्या काठपदराच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घालण्याऐवजी मल्टीकलर एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज घालून पाहा. एखाद्या सलवारकमीजवर पलॅझो घालून पाहा. लुकमध्ये बदल लगेच जाणवतो. त्यामुळे असे एव्हरग्रीन प्रकार कपाटात असणं गरजेचं आहे.

मल्टीकलर क्रॉप टॉप

क्रॉप टॉप तसा नुकताच ट्रेंडमध्ये आलेला प्रकार आहे. पण हे क्रॉप टॉप वेगवेगळ्या स्वरूपांत कित्येक कपडय़ांसोबत सहज घालू शकता. एरवी क्रॉप टॉप जीन्स, स्कर्ट किंवा पलॅझोवर क्रॉप टॉप वापरला जातो. पण सणांच्या दिवसांसाठी एम्ब्रॉयडर, मल्टीकलर क्रॉप टॉप कपाटात असूद्यात. एखाद्या साध्याशा साडीसोबत ब्लाउज म्हणून तो सहज वापरता येतो. त्याशिवाय घेरेदार स्कर्टसोबत चोली म्हणून वापरता येईल. तुमच्या एरवीच्या कॉटन पँट किंवा पलॅझोला एम्ब्रॉयडर क्रॉप टॉपने वेगळा लुक देता येऊ शकतो.

हटके केप्स

सुपर हिरोंच्या ड्रेसिंगमधील महत्त्वाचा भाग असलेले केप्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अर्थात त्याचा लुक थोडासा वेगळा आहे. गळ्यातून घालता येणारा, साधारणपणे कमरेपर्यंतच्या उंचीचा हा केप असतो. एरवीच्या कप्तानचे हे पालटलेले रूप. नेहमीच्या ओढणीचा किंवा जॅकेटचा कंटाळा आला असेल, तर केप सहज वापरता येईल. कुर्त्यांपासून लेहेंगापर्यंत वेगवेगळ्या ड्रेसेससोबत हा सहज घालता येतो. बरं बहुतेकदा जॉर्जेट किंवा लेस कापडापासून बनलेला असल्याने तुमचा कुर्ता झाकला जात नाही.

एक्स्ट्रा लाँग दुपट्टा

दुपट्टा, ओढण्या हा तसा आपल्यासाठी नवा प्रकार नाही. विशेषत: सणाच्या दिवसात सलवार, अनारकलीसोबत ओढणी येतेच. सध्या लांब ओढण्यांचा ट्रेंड आहे आणि त्या एरवीही साध्या लुकला फेस्टिव्ह ट्विस्ट देण्यासाठी नक्कीच वापरू शकता. साध्या कुर्त्यांवर मल्टीकलर, नाजूक बॉर्डरची ओढणी घेऊन बघा. अगदी जीन्स कुर्त्यांवरसुद्धा छानशी ओढणी घेतल्यास लुक बदलतो. बांधणी, लेहरीयाच्या ओढण्या कधीच बाजारातून जात नाहीत. या ओढण्या तुम्ही वापरू शकता. ड्रेससोबत जॉर्जेटच्या सिंगल कलर ओढण्या येतात. त्या ड्रेसला साजेशा दिसतही नाहीत. अशा वेळी मल्टीकलर दुपट्टा तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. सध्या हँडिपट्र केलेले दुपट्टे बाजारात आले आहेत. हाताने चित्रकला केल्यामुळे एक दुपट्टा दुसऱ्यापेक्षा पूर्ण वेगळा असतो. सिंपल कुर्त्यांसोबत हे दुपट्टे नक्कीच वापरू शकता. एखादा घेरेदार स्कर्ट आणि कुर्ता घातल्यास त्यावरही ओढणी घेता येईल. दुपट्टय़ाच्या ड्रेिपगच्या वेगवेगळ्या पद्धतीनेसुद्धा लुकमध्ये बदल जाणवतो.

स्टायलिश जॅकेट

नवरात्रीच्या दिवसांमध्ये कच्छी वर्क केलेली जॅकेट्स आली. प्रदर्शनात किंवा फॅशन स्ट्रीटला फेरफटका मारल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे एम्ब्रॉयडर जॅकेट्स नजरेस पडतात. कित्येकांवर स्टोनवर्क, पॅचवर्कसुद्धा केलेलं असत. असे जॅकेट तुम्ही ड्रेसवर ओढणीऐवजी सहज घालू शकता. नेहमीच्या सफेद शर्टवर एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट आणि जीन्स घातल्यास ऑफिसवेअरलासुद्धा फेस्टिव्ह लुक देता येऊ शकतो. सध्या इक्कत िपट्रचे जॅकेट आले आहेत. हे दोन्ही बाजूने घालता येतात. एकाच जॅकेटमध्ये दोन प्रकार मिळून जातात. फंकी िपट्रचे जॅकेटसुद्धा बाजारात आले आहेत. सध्याचा ट्रेंड आहे लांब जॅकेटचा. हे साडीवरसुद्धा वापरू शकता. प्रत्येक ड्रेससाठी वेगळा असा जॅकेटचा प्रकार घेण्याची गरज नसते. कपाटातील एखाददोन एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट तुम्ही वेगवेगळ्या ड्रेसेसवर सहज वापरू शकता.

कुठे मिळतील ? दादर, परेल, बोरीवली, अंधेरी येथील खास सणासुदीच्या कपडय़ांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांमध्ये हे कपडे उपलब्ध आहेत. सध्या मॉल्समध्येही फेस्टिव्ह कलेक्शन्स लागली आहेत. तेथेही कपडय़ांचे हे प्रकार उपलब्ध आहेत. याच्या किमती साधारणपणे ५०० रुपयांपासून सुरू होतात.