फळे, भाज्या, ऑलिव्ह तेल, कडधान्ये यांचा समावेश असलेला भूमध्य सागरी आहार मेंदूच्या आरोग्यास चांगला असतो, असा दावा नवीन अभ्यासात केला आहे. वृद्ध लोकांसाठी या आहाराचा पाठपुरावा केला असता त्यांच्यात मेंदूची हानी तीन वर्षांच्या काळात कमी दिसून आली, तर ज्यांनी हा आहार घेतला नाही त्यांच्यात ती जास्त दिसून आली. आधीच्या अभ्यासापेक्षा वेगळे मत व्यक्त करताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, मासे जास्त खाणे व मांस कमी खाणे यांचा संबंध मेंदूशी असत नाही. भूमध्य सागरी आहारात फळे, भाज्या, ऑलिव्ह तेल, गहू, तांदूळ, मासे, दुग्धजन्य पदार्थ व मद्य, लाल मांस व कोंबडीजन्य उत्पादने (अर्थात मर्यादित प्रमाणात) असतात. आपले वय वाढते तसे मेंदूचा आकार कमी होतो. मेंदूच्या पेशी मरतात व त्याचा आकलन व स्मृतीवर परिणाम होतो, असे स्कॉटलंडच्या एडिंग्टन विद्यापीठाच्या मिशेल ल्युसियानो यांनी सांगितले. भूमध्य सागरी आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो असा या अभ्यासाचा अर्थ आहे, असे ल्युसियानो यांनी सांगितले. संशोधकांनी स्कॉटलंडमधील ९६७ वयोवृद्ध म्हणजे सत्तर वर्षांवरील व्यक्तींच्या आहार सवयींचा अभ्यास केला. त्यांना विस्मरणाची व्याधी नव्हती. ५६२ जणांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन केले असता भूमध्य  सागरी आहार घेणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील करडा भाग व कॉर्टेक्सची जाडी वाढलेली होती.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)