हवा प्रदूषणावर आताच उपाययोजना केली नाही, तर भारतात २०४० पर्यंत दररोज  सरासरी २५०० लोक मरतील असा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या वर्ल्ड एनर्जी आऊटलूक या अहवालात म्हटले आहे की, २०१५ मध्ये ५ लाख ९० हजार अकाली मृत्यू हे हवा प्रदूषणामुळे झाले आहेत, म्हणजे दिवसाला १६०० लोक हवा प्रदूषणाने मरण पावले असा त्याचा अर्थ होतो. भारताने भारत ६ मानक लागू केल्याने नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले तर पीएम २.५ कणांचे प्रमाणही कमी झाले, पण वाहनांचे प्रमाण वाढल्याने स्थिती फारशी बदलली नाही. जर गॅसचा वापर केला तर घरातील प्रदूषणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ८ लाखापर्यंत खाली येईल. भारतात अकाली मृत्यूंचे प्रमाण येत्या दोन दशकात १७ लाख होईल. एकूण आकडेवारी पाहता हवा प्रदूषणाने आयुष्यमान २३ महिन्यांनी कमी झाले आहे. वाढते उत्पन्न, औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे भारतात ऊर्जेचा वापर वाढला, त्यामुळे प्रदूषणही वाढले आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक फतिह बिरॉल यांनी सांगितले की, हवा प्रदूषण आशिया व आफ्रिकेत जास्त आहे पण तेथील देशांना प्रदूषणाची समस्या सोडवता आलेली नाही. एकूण मृत्यू प्रमाण अकार्बनीकरण धोरणे असूनही वाढत आहे. जगाचे आकडे बघता २०१५ मध्ये ६५ लाख मृत्यू हे हवा प्रदूषणामुळे झाले आहेत. रक्तदाब, आहार जोखिमा व धूम्रपान यानंतर प्रदूषणाचा चौथा धोका आहे. बाह्य़ हवा प्रदूषणाने ९ लाख बळी जातील, तर घरातील प्रदूषणाने ८ लाख लोक मरतील. उपाययोजना केल्यास ५ लाख ६० हजार बळी बाह्य़ प्रदूषणामुळे जातील, तर ३ लाख ६० हजार बळी घरातील प्रदूषणामुळे जातील. २०४० पर्यंत कोळशापासून तासाला १५०० टेरावॉट ऊर्जा निर्मिती भारतात अपेक्षित आहे. प्रदूषणाचे परिणाम रोखण्यासाठी १४५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रातील एक एकक देशांतर्गत उत्पादनात एक एकक सेवा उत्पादनाच्या दहा पट वीज वापरली जाते, त्यामुळे प्रदूषण होते.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)