मोबाइल फोन घेताना पहिले आकर्षण असते ते म्हणजे त्या मोबाइलचा कॅमेरा कसा आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात जसे झपाटय़ाने बदलत होत आहे तसतसे मोबाइलसुद्धा अधिक आकर्षक आणि स्मार्ट होऊ लागले आहेत. मोबाइल फोनमध्ये आधी कॅमेरा आला त्यानंतर त्याची स्पष्टता वाढत गेली. काही कालावधीनंतर पुढचा कॅमेरा आला व अगदी मागच्या वर्षी दोन कॅमेरा असलेला मोबाइल फोन बाजारात आला. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पर्यंत सगळ्यांनाच कॅमेऱ्याचे आकर्षण आहे आणि हेच लक्षात घेऊन व पुढील स्पर्धा ओळखून विवो या कंपनीने ‘विवो व्ही फाइव्ह प्लस’ हा मोबाइल बाजारात उपलब्ध केला आहे. या मोबाइलचे वैशिष्टय़ असे की या मोबाइलच्या पुढील बाजूस तब्बल वीस मेगापिक्सेल आणि आठ मेगापिक्सेल असे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत आणि फ्लॅशही देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांमुळे तुमचे सेल्फी फोटो अतिशय चांगले येतील शिवाय यात तुम्ही सेल्फी फोटोंना बोकेह इफेक्ट देऊ शकता (यात तुम्ही तुमचा फोटो काढल्यानंतर तुमच्या मागील बाजूचे चित्र ब्लर करू शकता ज्यामुळे एखाद्या व्यावसायिक कॅमेरामधून काढले जाणारे फोटो विवोच्या या मोबाइल मधून काढता येते).

मोबाइलच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सएलचा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आले आहे. यात अँटी शेक मोड देण्यात आला आहे ज्याचा उपयोग करून तुमचे फोटो अधिक स्पष्ट आणि चांगले येण्यास मदत होईल. एकूण बघायला गेलं तर हा मोबाइल कॅमेराच्या बाबतीत अतिशय चांगला आहे, परंतु काढलेले फोटो मोबाइलमध्ये चांगले दिसावेत म्हणून यात ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या उपयोगाने तुम्ही फोटो, व्हिडीओ, गेम्स अधिक चांगल्या प्रकारे बघू शकता. शिवाय यात कॉर्निग गोरिला ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे ज्यामुळे ओरखडे पडण्यापासून या मोबाइलच्या डिस्प्लेचे संरक्षण होईल. मोबाइलच्या जास्त वापरामुळे आपल्या डोळ्यांचे खूप नुकसान होत आहे म्हणूनच या मोबाइलमध्ये आय प्रोटेक्शन मोड देण्यात आला आहे. ‘विवो व्ही फाइव्ह प्लस’ या मोबाइलमध्ये स्न्पड्रॅगॉन ६२५ ऑक्टा कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलचा विनाअडथळा उपयोग करू शकता. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. ‘विवो व्ही फाइव्ह प्लस’मध्ये फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी देण्यात आली आहे, परंतु यात तुम्ही मेमरी कार्डचा वापर करू शकत नाही. मोबाइल असला म्हणजे गाणी आली आणि ती गाणी अधिक सुस्पष्ट ऐकू येत असतील तर मोबाइल वापरायचा एक चांगला अनुभव तुम्ही घेऊ शकता.

‘विवो व्ही फाइव्ह प्लस’मध्ये हाय-फाय म्युझिक हे तंत्र वापरले असून त्याच्या उपयोगाने तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे गाण्यांचा आनंद लुटू शकता. मोबाइलचा उपयोग करत असताना एखाद्या वेळेस गाणी किंवा व्हिडीओ बघत असताना दुसरीकडे चॅटिंग चालू असते अशामुळे दोन्ही कामे एकाच वेळेस करता यावी म्हणून स्मार्ट स्प्लिट हा पर्याय देण्यात आला आहे. याच्या उपयोगाने तुम्ही एकाच वेळी दोन अ‍ॅप्लिकेशनचा वापर करू शकता. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल दोन सिम कार्डला साहाय्य करतो तसेच टूजी, थ्रीजी, फोरजी आणि व्हिओएलटीईला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे आणि तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता. फोनच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे ज्याचा उपयोग स्क्रीन अनलॉक करण्यासाठी करू शकता. विवो व्ही फाइव्ह प्लसमध्ये ३०५५ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा मोबाइल जलद चार्जिगला साहाय्य करतो. या मोबाइलची रुंदी ७४ एमएम आणि उंची १५२.५८ एमएम देण्यात आली आहे. स्मार्टफोनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा म्हणून यात सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. मोबाइलच्या बॉक्समध्येच तुम्हाला स्क्रीन गार्ड आणि मोबाइल कव्हर उपलब्ध आहे. ‘विवो व्ही फाइव्ह प्लस’ ऑनलाइन आणि दुकानात दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

फायदे
उत्कृष्ट आणि विविध वैशिष्टय़े असलेला कॅमेरा.
गोरिला ग्लासचे संरक्षण.
आय प्रोटेक्शन मोड.
चांगला प्रोसेसर.
स्मार्ट स्प्लिट मोड.
जलद चार्जिगला साहाय्य.
ऑनलाइन आणि दुकानात दोन्ही ठिकाणी उपलब्ध.
तोटे
कमी बॅटरी
इतर उपलब्ध असलेल्या मोबाइलच्या तुलनेत किंमत अधिक.
मोबाइल किंमत :
विवो व्ही फाइव्ह प्लस
रु. २७,९८०/-