सिगारेटमुळे कर्करोग होतो, असं आपण अनेक ठिकाणी ऐकले आणि वाचले असेलच. सिगारेटचे व्यसन सोडवणे ज्यांना कठीण आहे त्यांच्यासाठी इलेक्टॉनिक सिगारेटच्या पर्यायाचा शोध लावण्यात आला होता. पण ‘एनवायरमेंटल सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’ने नुकत्याच प्रसिदध केलेल्या एका निरीक्षणाद्वारे इ- सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या धुरातही काही हानिकारक घटक असतात असे लक्षात आणले आहे. हे घटक कॅन्सरसारख्या रोगाला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात असेही या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
‘लॉरेन्स बर्केले नॅशनल लेबॉरेटरी’ तर्फे करण्यात आलेल्या एका निरीक्षणामध्ये दोन इ- सिगारेटचा वापर करत त्यातून निघणाऱ्या धुराचे निरीक्षण करण्यात आले असता ही माहिती समोर आली आहे. या सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या एकूण ३१ हानिकारक घटकांमध्ये दोन कॅन्सरजन्य घटक असल्याचे समोर आल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक इ- सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या विषारी घटकांचे प्रमाण हे त्या सिगारेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘हिटींग ऑईल’वर अवलंबून असतात. सिगारेटमधील द्रव्यांचे तापमान जितके जास्त तितकेच धुरामार्फत बाहेर पडणाऱ्या हानिकारक घटकांचे प्रमाण जास्त असते असेही या निरीक्षणादरम्यान आढळून आले. इ- सिगारेटमध्ये घातक द्रव्ये असतात हे यापूर्वी झालेल्या काही निरीक्षणांमध्ये सिद्ध करण्यात आले होते. बर्केले मधील संशोधक ह्युगो डेस्टैल्लियट्स यांनी याविषयी आपले मत मांडताना ‘बऱ्याच काळापासून सिगरेटच्या आहारी गेलेल्यांना एकाएकी सिगारेट सोडणे अशक्य असते. पण वस्तुस्थिती मात्र हेच दर्शवते की, सर्वसाधारण सिगारेटच्या तुलनेत इ- सिगरेट कमी हानिकारक असते’ असे ते म्हणाले. इ-सिगारेटची संकल्पना पाहता त्यात घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचे प्रमाण तुम्ही ते सिगारेट किती वेळासाठी वापरता यावरही अवलंबून आहे. प्रमाणापेक्षा जास्त वेळ सिगरेट वापरल्यामुळे त्यातून धुरावाटे बाहेर पडणाऱ्या फॉर्मेल्डीहाईड, अॅसेटेल्डीहाईड आणि अॅक्रोलिन सारखे घटक बाहेर पडतात. सिगारेटच्या व्ससनाचे प्रमाण पाहता २०१३ च्या तुलनेत सध्याच्या घडीला इ- सिगारेट वापरणाऱ्यांच्या आकड्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही तज्ञांच्या मते सर्वसाधारण सिगारेटच्या तुलनेत इ- सिगरेट हा उत्तम पर्याय असला तरीही हल्लीच्या तरुण पिढीमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. इ- सिगारेटपासून होणारे संभाव्य धोके जाणून घेण्यासाठी हे निरीक्षण करण्यात आले होते, जेणेकरुन इ सिगारेटचे उत्पादक, विक्रेते आणि हे सिगारेट वापरणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यामुळे इ- सिगारेटचा वापर करताना आणि त्याचे उत्पादन करताना त्यातून बाहेर पडणाऱ्या घातक व कॅन्सरजन्य घटकांकडेही तुमचे लक्ष असू द्या.